मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात; 'असा' आहे पदयात्रेचा मार्ग
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 22, 2024 18:25 IST2024-01-22T18:25:22+5:302024-01-22T18:25:58+5:30
पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले....

मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात; 'असा' आहे पदयात्रेचा मार्ग
पिंपरी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून शनिवारी (दि.२०) मुंबईकडे रवाना झाली आहे. ती बुधवारी (दि.२४) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केले आहे.
असा असेल पदयात्रेचा मार्ग...
मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे दाखल होणार आहे. रक्षक चौक,जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन- खंडोबा मंदिर, आकुर्डीमार्गे निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्पावरून तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत.