"माझ्यासोबत लग्न कर नाहीतर....!"; धमकी देत भोसरीत तरुणीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:31 IST2022-04-28T16:00:03+5:302022-04-28T16:31:29+5:30
भोसरी येथे २२ एप्रिल रोजी ही घटना घडली....

"माझ्यासोबत लग्न कर नाहीतर....!"; धमकी देत भोसरीत तरुणीचा विनयभंग
पिंपरी : माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी तुला सोडणार नाही, असे म्हणून फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी देऊन विनयभंग केला. तसेच तिच्या होणाऱ्या पतीला बदनामीकारक माहिती देऊन तिच्याशी लग्न न करण्याची धमकी दिली. धावडेवस्ती, भोसरी येथे २२ एप्रिल रोजी ही घटना घडली.
वैभव रामचंद्र सोमवंशी (रा. इंद्रायणीनगर, भोसरी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित तरुणीने याप्रकरणी बुधवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला फोन केला. तुझे लग्न ठरल्याचे मला माहित झाले आहे. तुझे लग्न कसे होते तेच मी पाहतो. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्याबाबत सांगून तुझे लग्न मोडतो. तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर आपले दोघांचे फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून तुझी लाईफ बरबाद करतो' अशी आरोपीने तरुणीला धमकी दिली.
वारंवार तरुणीला फोन करून त्याच्यासोबत लग्न करण्याची मागणी घातली. तरुणीच्या वडिलांना फोन करून फिर्यादी तरुणीचे लग्न न करण्याची धमकी दिली. तरुणीच्या होणाऱ्या पतीला फोन करून आरोपीने फिर्यादीबाबत चुकीची माहिती दिली. फिर्यादीचे फोटो पाठवून तिची बदनामी केली. फिर्यादी तरुणीसोबत लग्न न करण्याबाबत धमकी दिली.
फिर्यादी तरुणी २६ एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या घराजवळ उभी असताना आरोपी दुचाकीवरून आला. माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपीने तरुणीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे.