वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळली; देहूरोड पोलिसांनी काढली बाजारपेठेतून धिंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 21:52 IST2025-04-13T21:52:38+5:302025-04-13T21:52:38+5:30
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्याला अटक

वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळली; देहूरोड पोलिसांनी काढली बाजारपेठेतून धिंड
नारायण बडगुजर
पिंपरी : ‘तुम्हाला येथे धंदा करणे मुश्किल करून टाकीन, तसेच तुम्हाला कायमचे संपवून टाकीन’ असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मंडळ नोंदणीकृत नसताना अथवा कोणतेही अधिकारपत्र नसताना वर्गणी जमा करीत असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून खंडणी जमा करणाऱ्याला देहूरोड पोलिसांनी रविवारी ( दि. १३) अटक केली. तपासकामी बाजारातून त्याची धिंड काढली.
राजू उर्फ राजा मासलामनी पिल्ले (३५ ,रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. प्रशांत अमृतलाल कटारिया (४७, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत नसलेले किंवा कोणतेही अधिकारपत्र नसलेल्या मंडळाच्या नावाने राजू पिल्ले याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे वर्गणी मागितली. त्यासाठी व्यापाऱ्यांना धमकावले. मेन बाजारपेठेतील दोन दुकानांच्या नावाने पिल्ले याने जबरदस्तीने पावती बनवली. दोन्ही दुकानांचे एक हजार रुपये द्या, अशी मागणी केली. फिर्यादी प्रशांत कटारिया यांचे चुलते अरविंद कुंदनलालजी कटारिया यांनी दोन्ही दुकाने एकच असल्याने पाचशे रुपये दिले. ‘तुम्हाला येथे धंदा करणे मुश्किल करून टाकीन, तसेच तुम्हाला कायमचे संपवून टाकीन,’ असे म्हणून पिल्ले याने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागत पैसे घेतले.
दरम्यान, अरविंद कटारिया यांना हृदयविकाराचा त्रास झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले होते. रविवारी व्यापारी आणि राजकीय पदाधिकारी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. राजा पिल्ले याला अटक केली. त्याची देहूरोड बाजारपेठ, ज्वेलर्स मार्केट, भाजी मंडई परिसरात धिंड काढण्यात आली. राजा पिल्ले याच्यावर हिंजवडी, देहूरोड व शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये चार गुन्हे दाखल आहेत.