LPG Gas Crisis: गॅस नसल्याने मेनूला कात्री; हॉटेल्समधून भजी-वडा, डोसा, उत्तप्पा, समोसा गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:06 IST2026-03-17T11:04:46+5:302026-03-17T11:06:09+5:30
चुली, डिझेल भट्टी आणि इंडक्शनच्या वापरावर भर

LPG Gas Crisis: गॅस नसल्याने मेनूला कात्री; हॉटेल्समधून भजी-वडा, डोसा, उत्तप्पा, समोसा गायब
पिंपरी : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल्सनी मेनूमधील पदार्थ कमी केले आहेत. जास्त गॅस लागणारे पदार्थ गायब झाले आहेत. काही ठिकाणी चहा-कॉफी देणेही बंद करण्यात आले आहे. बहुतांश हाॅटेल्समध्ये चुली, डिझेल व कोळसा भट्टी आणि इंडक्शनचा वापर सुरू करण्यात आला आहे.
गॅसचा तुटवडा असल्याने जास्त गॅस लागणारे पदार्थ सध्या बंद झाले आहेत. भजी, वडा, पुरी-भाजी, मसाला डोसा, उत्तप्पा, समोसा यांसारखे तळणीचे पदार्थ बहुतेक हॉटेलांमध्ये मिळेनासे झाले आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यांना मेनूमधून काढून टाकण्यात आले आहे.
पर्यायी व्यवस्था म्हणून काही हॉटेल्सनी डिझेल भट्टी, चुली आणि इलेक्ट्रिक इंडक्शनचा वापर सुरू केला आहे. मात्र, या साधनांवर मर्यादित पदार्थच तयार करता येत असल्याने नाश्ता आणि जेवणात साधे पदार्थ ठेवले जात आहेत. सध्या पोहे, उपमा, इडली, साधा डोसा, खिचडी, दही-भात आणि मर्यादित थाळी असे कमी गॅस लागणारे पदार्थ दिले जात आहेत.
निगडी जकात नाक्याजवळील नामांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी केवळ पनीर, मशरूम आणि मिक्स व्हेज असे तीनच पर्याय ठेवले आहेत. येथे चहा-कॉफी पूर्णपणे बंद असून, स्वयंपाकासाठी डिझेल भट्टीचा वापर सुरू आहे. थेरगावातील हॉटेलमध्ये तव्यावर तयार होणारे पदार्थ बंद करून चुलीवर इडली आणि काही मर्यादित पदार्थ दिले जात आहेत. चहासाठी इंडक्शनचा वापर सुरू आहे.
पिंपरी चौकातील हॉटेलने वेळही कमी केली आहे. सकाळी सातऐवजी दुपारी अकरा ते रात्री अकरा या वेळेतच सेवा दिली जाते. येथे स्पेशल डिशेस, पुरी-भाजी आणि चना भटुरा बंद आहे, तर पिंपरी रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेलमध्ये गेल्या दहा दिवसांपासून फक्त पावभाजी आणि पुलावच उपलब्ध आहेत.
दरम्यान, काही हॉटेल्समध्ये डोसा किंवा इडलीसोबत चटणी दिली जात असली तरी सांबार बंद केले आहे किंवा अत्यंत कमी प्रमाणात दिले जात आहे. गॅसचा वापर कमी ठेवण्यासाठी ही उपाययोजना करावी लागत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.