उद्या रंगणार पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:37 IST2025-10-17T15:34:25+5:302025-10-17T15:37:43+5:30
पद्मश्री सुरेश वाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांचा अनुभवा मनमोहक कलाविष्कार

उद्या रंगणार पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’
पुणे : दिवाळीचा उजेड, पहाटेचा गारवा आणि स्वरांच्या लहरींनी भारलेले वातावरण अशा सुरेल वातावरणात संगीत रसिकांसाठी ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ ही सूरमयी पर्वणी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. सप्तसुरांच्या माधुर्याने दिवाळीची पहाट उजळवणारी ही मैफल शनिवार (दि.१८) रोजी पहाटे ५:३० वाजता चिंचवड येथील श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलात रंगणार आहे.
या संगीत सोहळ्यात भारतीय संगीत क्षेत्रातील दोन प्रख्यात कलाकारांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान असलेले पद्मश्री सुरेश वाडकर, तसेच आपल्या सुमधुर आवाजाने नवी पिढी मोहित करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र या दोघांचा अद्वितीय कलाविष्कार सादर होणार आहे. ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ ही केवळ एक संगीत मैफल नसून, पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक ओळखीला उजाळा देणारी पर्वणी आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सकाळच्या प्रसन्न वातावरणात पारंपरिक राग, भक्तिमय बंदिशी आणि आधुनिक स्वरांचे मिश्रण रसिकांना नव्या ऊर्जेचा अनुभव देणार आहे.
या नामांकित गायकांना साथसंगत करणार आहेत सिंथेसायझरवर सत्यजीत प्रभू, बासरीवर वरद कठापूरकर, गिटारवर मनीष कुलकर्णी, तबल्यावर विनायक नेटके, ढोलकी-पखवाजवर कृष्णा मुसळे आणि ऑक्टोपॅडवर भिसाजी तावडे. कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत सुहाना मसाले, पीएनजी ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, काका हलवाई आणि आरा स्टाइल.
‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ हा केवळ संगीत कार्यक्रम नाही, तर सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी दर्जेदार सादरीकरण घडवून आणण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न असतो. पद्मश्री सुरेश वाडकर आणि सावनी रवींद्र यांच्यासारखे गुणी कलाकार एका मंचावर येत आहेत, हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. - पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
संगीत आणि सुगंध या दोन्ही गोष्टी आनंद देतात. ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ ही अशीच एक आनंदाची पहाट आहे. ‘लोकमत’सारख्या माध्यमाने सांस्कृतिक परंपरेला प्रोत्साहन देणे ही अभिमानाची बाब आहे. पुणेकरांच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम वर्षागणिक अधिक बहरत चालला आहे. - मोती पंजाबी, चेअरमन, रामा ग्रुप.
दिवाळी हा आनंद, नाती आणि सौंदर्य साजरे करण्याचा सण आहे. त्यात संगीताची जोड मिळाल्यावर सणाचे सोने होते. पद्मश्री सुरेश वाडकर आणि सावनी रवींद्र यांच्या सुमधुर आवाजाने दिवाळीची ही पहाट खऱ्या अर्थाने ‘स्वरमय’ होणार आहे. - विशाल चोरडिया, संचालक, मार्केटिंग ॲण्ड स्ट्रॅटेजी, प्रवीण मसाले.
‘लोकमत’ने पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक नकाशावर ‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाद्वारे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पहाटेच्या गारव्यात संगीत ऐकणे ही परंपरा आता वाढत चालली असून दिग्गज कलाकरांना अनुभवणे ही मोठी बाब आहे. - डॉ. सौरभ गाडगीळ, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स
कधी कुठे केव्हा?
शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५, पहाटे ५:३० वा.
स्थळ : श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडा संकुल, चिंचवड.