led light will be put on police shoulder | पाेलिसांच्या खांद्यावर एलईडी लाईट बसविण्याचा हाेणार प्रयाेग
पाेलिसांच्या खांद्यावर एलईडी लाईट बसविण्याचा हाेणार प्रयाेग

लोणावळा : रात्र गस्त घालणार्‍या पोलीसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लावण्याचा अनोखा प्रयोग लोणावळा शहरात करण्यात येणार आहे. अर्थात असे केल्यानंतर त्यापासून मिळणारी कायदेशिर उपयुक्तता व तोटे याची सध्या पडताळणी सुरु असून त्यानंतर प्रायोगिक तत्वावर ही संकल्पना राबविण्याबाबत विचार करण्यात येईल अशी माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी दिली.

पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासोबतच गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने काही महिन्यांपुर्वी ई पेट्रोलिंग सुरु केली. यामुळे गुन्हेगारी व रात्र चोर्‍यांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील लोणावळा शहर, बारामती व इतर दोन तिन महत्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु केलेली ई पेट्रोलिंग आता नियमित सुरु आहे.

लोणावळा शहराच्या सर्व भागात पोलीस पथकांचा राऊंड होईल याचा विचार करुन शहरातील 60 ठिकाणी एक सेन्सर बसविण्यात आला आहे. यामध्ये महत्वांचे चौक, शाळा, मह‍विद्यालये, धार्मिक ठिकाणं, काही सोसायट्या हाॅटेलस, सराफ कट्टा, रेल्वे व बस स्थानक, गॅरेज यांचा समावेश आहे. साधारणतः दुचाकी गाडीवरुन दिवसा व चारचाकी गाडीमधून रात्रीच्या वेळेस ही गस्त घातली जाते. गस्तीवरील कर्मचार्‍यांकडे मोबाईल सारखे दिसणारे एक डिव्हाईस देण्यात आले आहे. गस्त दरम्यान ज्याठिकाणी सेन्सर बसविले आहेत त्याठिकाणी जाऊन सदर सेन्सर समोर सदरील डिव्हाईस धरताच त्याठिकाणाचे लोकेशन व वेळ हे पोलीस अधिक्षक व पोलीस निरीक्षक यांना मोबाईलवर समजत असल्याने कर्मचारी देखिल काटेकोरपणे सर्व ठिकाणांवर भेटी देतात. शहराचा बहुतांश सर्व भाग या गस्तीच्या कक्षात घेण्यात आला असल्याने संपुर्ण शहरावर पोलीसांची नजर कायम आहे. पोलीस प्रशासनाची दिवसा व रात्री गस्त होत असल्याने नागरिकांमध्ये देखिल सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. 

रात्र गस्तीवर असलेला पोलीस कर्मचारी दूरवरुन ध्यानात यावा तसेच नागरिकांमध्ये पोलीस गस्तीमुळे सुरक्षेची भावना निर्माण व्हावी. लोणावळा शहर पर्यटनकरिता प्रसिध्द शहर असल्याने येथे दिवसरात्र पर्यटकांची वर्दळ असते, अनेक वेळा पोलीस कोठे आहेत, याबाबत नागरिकांना कल्पना मिळावी याकरिता गस्तीवरील पोलीसांच्या खांद्यावर एलईडी लाईट बसविण्याबाबतची चाचपणी सुरु आहे. हे दिवे बसविण्याची कायदेशिर उपयुक्तता व तोटे हे देखिल विचारात घेण्यात येणार आहेत.


Web Title: led light will be put on police shoulder
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.