मविआत गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले; एकनाथ पवार पुन्हा भाजपामध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 11:21 IST2025-02-15T11:21:45+5:302025-02-15T11:21:58+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये इनकमिंग सुरू

मविआत गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले; एकनाथ पवार पुन्हा भाजपामध्ये
पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधून उद्धवसेनेत गेलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला. नांदेड येथे विभाग बैठकीदरम्यान हा प्रवेश झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते.
लोहा-कंधार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते आणि शहराध्यक्ष पवार यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना उद्धवसेनेचे राज्य संपर्क नेते करण्यात आले होते. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवाला उद्धवसेनेचे नेते कारणीभूत आहेत, अशी टीका त्यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती.
राज्यात महायुतीचे सरकार आल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे, तर महायुतीमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत गेलेले नेते पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. पवार यांनीही शुक्रवारी भाजपामध्ये प्रवेश केला.