Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड
By नारायण बडगुजर | Updated: May 3, 2023 18:20 IST2023-05-03T18:19:34+5:302023-05-03T18:20:01+5:30
आम्ही टाॅवर लाइनचे दादा आहोत, असे म्हणून वाहनांची तोडफोड

Pimpri Chinchwad: कोयता गँगचा पुन्हा राडा; पिंपरीत वाहनांची तोडफोड
पिंपरी : आम्ही टाॅवर लाइनचे दादा आहोत, असे म्हणून दहशत पसरविण्यासाठी वाहनांची तोडफोड केली. तसेच एका वाहनचालकावर दगडफेक केली. शिवशक्ती हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, रुपीनगर, टावर लाईन, तळवडे येथे शनिवारी (दि. २९) रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुनील सोपान बरबटे (वय ५१, रा. शिवशक्ती हौसिंग सोसायटी, सहयोगनगर, रुपीनगर, टावर लाईन, तळवडे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ३०) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उमेश भारत उदागे (वय २५, रा. लांडेवाडी, भोसरी), रोशन रवींद्र सोनवणे (वय २४, रा. पाटीलनगर, चिखली) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून हातात कोयता घेऊन स्वत:ची सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविण्याच्या उद्योशाने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. आरोपी आरडाओरडा करीत जात असताना फिर्यादीने त्यांना हटकले. आरडाओड का करता, असे फिर्यादीने विचारले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तू आम्हाला ओळखत नाहीस का, आम्ही टाॅवर लाइनचे दादा उमेश उदागे व रोशन साेनवणे आहोत. तू आम्हाला विचारतो का, असे आरोपी म्हणाले. तसेच त्यांनी दगड फेकून मारेल. फिर्यादीच्या टेम्पोला ते दगड लागून टेम्पोचे नुकसान झाले. आरोपी उमेश उदागे हा कोयता घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीला शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच परिसरातील इतर वाहनांची ताेडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.