पिंपरीतील खळबळजनक घटना! मित्र जेवणासाठी न आल्याने महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By नारायण बडगुजर | Updated: July 14, 2022 20:00 IST2022-07-14T20:00:39+5:302022-07-14T20:00:48+5:30
महिलेच्या पतीनेही दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती

पिंपरीतील खळबळजनक घटना! मित्र जेवणासाठी न आल्याने महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी : महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मित्र जेवण करण्यासाठी लवकर आला नाही म्हणून तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी मोशी येथे उघडकीस आली.
सुलोचना नामदेव लेकुरवाड (वय ३०, रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर ती लातूर येथून पिंपरी -चिंचवड शहरात आली. ती हाऊस किपिंग आणि जेवण बनविण्याचे काम करीत होती. तिला चार मुली असून त्या गावाकडे शिकण्यास आहेत. कामाच्या ठिकाणी सुलोचना हिची एका परप्रांतियाशी ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री होऊन ते लग्न देखील करणार होते. सुलोचना आणि तिचा परप्रांतीय मित्र सध्या राहण्यास वेगवेगळे होते मात्र जेवण एकत्र करीत असत. बुधवारी रात्री सुलोचना यांनी जेवण तयार केले. तिने परप्रांतीय मित्राला जेवणाकरिता बोलविले. मात्र तो लवकर आला नाही. या कारणावरून तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.