शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
By विश्वास मोरे | Updated: July 18, 2024 13:09 IST2024-07-18T13:08:47+5:302024-07-18T13:09:41+5:30
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा रंगू लागली, ही बाब अजित पवार यांनी गांभीर्याने घेतली

शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे शहराध्यक्षांसह काही नगरसेवक शरद पवारांच्या गटात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने गुरुवारी पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मते जाणून घेतली. शहरातील प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. बैठकीबद्दलचे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. तर महायुती मधील घटक पक्ष अस्वस्थ आहेत. पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह काही पदाधिकारी यांनी कालच शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा रंगू लागली. ही बाब अजित पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे, त्यामुळे पुण्यात गुरुवारी सकाळी तातडीची बैठक घेतली. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, जगदीश शेट्टी, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता अल्हाट, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सतीश दरेकर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक दशकांपासून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विश्वासू सहकारी, लोकप्रतिनिधी, पार्टी पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी शहरातील अनेक समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि एकजूट आपल्याला आगामी काळात नक्कीच अधिक बळकट करेल, असा विश्वास आहे.'