Atm Blast In Pimpri Chinchwad: पिंपरीत चोरट्यांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट करून उडवले एटीएम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:21 IST2022-04-21T11:20:45+5:302022-04-21T11:21:23+5:30
एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली

Atm Blast In Pimpri Chinchwad: पिंपरीत चोरट्यांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट करून उडवले एटीएम
पिंपरी : स्फोट करून चोरट्यांनी एटीएम उडवले. यात एटीएमचे मोठे नुकसान झाले, मात्र एटीएममधील रोकड सुरक्षित राहिली. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक घाबरले. निगडी येथील त्रिवेणी नगर चौकात तळवडे रस्त्यावरील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये गुरुवारी (दि. २१) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
शहरात एटीएम फोडण्याच्या घटना सुरू आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्रिवेणी नगर चौकालगत असलेले कॅनरा बँकेचे एटीएम जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट करून फोडले. यामध्ये एटीएमचे मोठे नुकसान झाले. मात्र एटीएम मशीन फुटले नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. त्यावेळी तेथे असलेल्या एका नागरिकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे दुचाकीवरून पळून गेले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
दरम्यान, चिखली पोलीस ठाण्याचे गस्तीवरील कर्मचारी रात्री अडीचच्या सुमारास त्रिवेणी नगर चौकात आले होते. त्यावेळी त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कॅनरा बँकेच्या या एटीएमला भेट दिली, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.