५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर पिंपरीत ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर का नाही? संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:36 IST2021-07-09T17:32:45+5:302021-07-09T17:36:03+5:30
स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची ईडीकडे तक्रार करणार

५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर पिंपरीत ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर का नाही? संजय राऊत
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरे वाढले आहे. या दौऱ्यांमध्ये महापालिका निवडणुकांच्या रणनीती ठरविण्याचे प्रयत्न देखील सुरु आहे. सध्या भाजपच्या हातात असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
शिवसेना संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आकुर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.
राऊत म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणार आहे. आणि महापालिकांच्या निवडणुकीतील आघाडीबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ५५ नगरसेवक करण्याचे टार्गेट आहे.’’ ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर होणार का? या प्रश्नावर ‘‘५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, मग ५५ जागांवर पिंपरीत शिवसेनेचा महापौर का नाही असे राऊत म्हणाले.
औद्योगिकनगरीत गेल्या साडेचार वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. याउलट जास्त वाढताना दिसत आहे. भय, भ्रष्टाचारमुक्त ही सगळी ठेकेदारीची रिंग आहे. शहरातील आमदारांसह इथले सगळे प्रमुख लोक महापालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतलेत. महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. भ्रष्टाराची प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे कुटूंबीय संचालक असलेल्या स्मार्ट सिटीतील कंपनीच्या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे तक्रार करणार आहे, असा आरोप शिवसेना संपर्क प्रमुख आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
खासदार राऊत म्हणाले, ‘‘महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट झाली आहे. भाजपच्या मुंबईत बसलेल्या प्रमुख नेत्यांनी यावर मत व्यक्त केले पाहिजे. दुस-यांवर जसे बोलतात. तसे यावर बोलणे देखील गरजेचे आहे. त्यांना स्वत:वरील टीका सहन होत नाही. ’’
..............................
राज्य सरकार तपास करीत नाही
राऊत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीची कामे घेणा-या कंपनीत कोणाचे कुटुंबीय संचालक आहेत. याबाबतची सगळी कागदपत्रे ईडीला पाठविणार आहोत. असे तपास हल्ली राज्य सरकार करत नाही. ईडी करते. ईडीकडे माहिती नसेल. तर, आम्ही पाठवून देवू, महापालिकेतील प्रकरणे आता बाहेर येत आहे. कोरोना काळात चौकशा केल्या नाहीत. आता प्रकरणे बाहेर येत असून चौकशा केल्या जातील. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यहार जनतेच्या पैशांची लूट सहन करणार नाहीत.’’