पैसे नसल्याने आयसीयू नाकारला; जिल्हा रुग्णालयात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू;चौकशी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:26 IST2026-03-10T17:25:51+5:302026-03-10T17:26:37+5:30

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी : चौकशी समिती नेमली असून दोन दिवसांत अहवाल सादर होणार

ICU denied due to lack of money; 18-year-old dies in district hospital | पैसे नसल्याने आयसीयू नाकारला; जिल्हा रुग्णालयात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू;चौकशी सुरु

पैसे नसल्याने आयसीयू नाकारला; जिल्हा रुग्णालयात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू;चौकशी सुरु

पिंपरी : खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या बेडसाठी पैसे नसल्याने संकेत रणजित सूर्यवंशी (वय १८, रा. नवी सांगवी, मूळ रा. लातूर) याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीस त्यास सर्वसाधारण वॉर्ड आणि त्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शनिवारी (दि. ७) सकाळी मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप मुलाची आई रागिणी सूर्यवंशी यांनी केला आहे. तर याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी दिले आहेत.

रागिणी सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेतला नवी सांगवी येथील खासगी रुग्णालयाने ‘आयसीयू’ची गरज असल्याचे सांगितले. मात्र, आयसीयूसाठी पैसे नव्हते. औंध जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास आणले. स्ट्रेचर ढकलण्यास एका वॉर्डबॉयला सांगितले. मात्र, हे आमचे काम नाही, म्हणत मदत करण्यास नकार दिला. तर आपत्कालीन विभागातील डॉक्टारांनी ‘आयसीयू’ची गरज नसल्याचे सांगितले. जनरल वॉर्डात दाखल केले. मात्र, तेथे उपचार केले नाहीत. रात्री दोननंतर त्याची तब्बेत खालावली. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तोंडातून रक्त येत होते. मात्र, आम्हाला शिकवू नका, असे म्हणत तेथील डॉक्टरांनी चालढकल केली. पहाटे चारला त्याला ‘आयसीयू’मध्ये दाखल केले. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

आईवरही उपचार करण्यास कुचराई

संकेतची मोठी बहीण येथे परिचारिकेचे प्रशिक्षण घेत आहे. तर वडील तात्पुरते चालकाचे काम करतात. मुलगा गेल्याने आईला धक्का बसला. त्यामुळे रक्तदाब वाढला. मात्र, त्यांना तपासण्याची व उपचार करण्याची तसदी कर्मचाऱ्यांनी घेतली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

चौकशी समिती नेमली असून, दोन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

Web Title : लापरवाही का आरोप: अस्पताल में देरी से बेटे की मौत, परिवार का दावा

Web Summary : परिवार का आरोप है कि अस्पताल ने भुगतान में देरी के कारण आईसीयू में भर्ती करने में देरी की, जिससे बेटे की मौत हो गई। घटना के बाद आंतरिक जांच शुरू की गई। परिवार का यह भी दावा है कि मां को चिकित्सा सहायता से वंचित किया गया।

Web Title : Negligence Alleged: Son Dies After Hospital Delays, Family Claims

Web Summary : Family alleges negligence led to son's death after hospital delayed ICU admission due to payment issues. Internal inquiry initiated after the incident. The family also claims the mother was denied medical attention.