'फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू'; महिलेला धमकावल्याने पती-पत्नीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:03 IST2022-03-16T16:58:23+5:302022-03-16T17:03:08+5:30

आरोपींकडून धमकी देऊन फिर्यादीला शिवीगाळ...

husband and wife charged for threatening woman latest crime news in pimpri chinchwad | 'फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू'; महिलेला धमकावल्याने पती-पत्नीवर गुन्हा दाखल

'फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू'; महिलेला धमकावल्याने पती-पत्नीवर गुन्हा दाखल

पिंपरी : फ्लॅट साडेसतरा लाखांना आम्हाला विकून येथून निघून जा, नाहीतर तुझे हातपाय तोडू, अशी धमकी देऊन एक जण महिलेच्या अंगावर धावून आला. याप्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सुदर्शननगर, चिंचवड येथे १३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

अखिल अशोक परब, प्रणाली अखिल परब (रा. सुदर्शननगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फ्लॅटधारक महिलेने मंगळवारी (दि. १५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मालकीच्या फ्लॅटच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रितम पाटील या व्यक्तीला घेऊन फिर्यादी गेल्या. तसेच फिर्यादी हे प्रितम पाटील व सागर अपार्टमेंटच्या बाजूच्या बोळातील परिसर स्वच्छ करून घेत होत्या. त्यावेळी आरोपी तेथे आले. अपार्टमेंटच्या बोळीत पडलेला लोखंडी राॅड हातात घेऊन आरोपी अखिल परब हा फिर्यादीच्या अंगावर धामूवन आला. तू मला तुझा फ्लॅट साडेसतरा लाख रुपयांना विकून येथून निघून जा, फ्लॅट मला नाही विकला तर मी तुझ्या नवऱ्याचे व तुझे हात पाय मोडेन आणि तुम्हाला येथे राहू देणार नाही, अशी धमकी देऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. 

आरोपी प्रणाली हिने देखील फिर्यादीला शिवीगाळ केली. तुला आम्ही साडेसतरा लाख रुपये देतो, तू तुझा फ्लॅट आम्हाला विकून येथून निघून जा, नाही तर आम्ही तुला तुझ्या जागेत पाय पण ठेवू देणार नाही, तसेच तू आम्हाला तुझा फ्लॅट विकला नाही तर आम्ही तुझ्या व तुझ्या नवऱ्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये वारंवार गुन्हे दाखल करून त्रास देऊ, अशी धमकी आरोपी प्रणाली हिने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. 

फिर्यादी महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. खंडणी प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत.

Web Title: husband and wife charged for threatening woman latest crime news in pimpri chinchwad