लांबून येणारी बस ओळखणार कशी? पीएमपीच्या ‘डिजिटल’ प्रवासाचा फज्जा; अनेक बसवरील डिजिटल बोर्ड ‘ब्लॅक आऊट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:45 IST2026-01-26T13:44:26+5:302026-01-26T13:45:05+5:30
तांत्रिक अडचणीमुळे केवळ एक-दोन बसेसचे बोर्ड बंद असू शकतात, पीएमपी प्रशासनाची प्रतिक्रिया; ज्येष्ठ नागरिक आणि परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे हाल

लांबून येणारी बस ओळखणार कशी? पीएमपीच्या ‘डिजिटल’ प्रवासाचा फज्जा; अनेक बसवरील डिजिटल बोर्ड ‘ब्लॅक आऊट’
- आकाश झगडे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची ‘स्मार्ट’ म्हणून ओळख होत असताना, सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपी बसेसचा कारभार मात्र उलट्या दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक बसेसवरील डिजिटल मार्गदर्शक बोर्ड सध्या बंद अवस्थेत आहे. यामुळे प्रवाशांना बसचा मार्ग आणि क्रमांक ओळखणे कठीण झाले आहे. बोर्ड बंद असलेल्या बसेसची संख्या अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. तांत्रिक अडचणीमुळे केवळ एक-दोन बसेसचे बोर्ड बंद असू शकतात, अशी प्रतिक्रिया पीएमपी प्रशासनाकडून मिळाली.
लांबून बस ओळखणे अशक्य
बसच्या पुढच्या, मागच्या आणि एका बाजूला असलेले हे डिजिटल बोर्ड प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या बोर्डवर नारंगी रंगाच्या मोठ्या अक्षरांत बसचा मार्ग आणि क्रमांक झळकतो. ज्यामुळे प्रवाशांना तो लांबूनच स्पष्ट दिसतो. बोर्ड बंद असल्याने प्रवाशांना बस जवळ आल्याशिवाय ती नेमकी कुठे जाणार आहे, हे कळत नाही. यामुळे अनेकदा बस सुटते किंवा चुकीच्या बसमध्ये चढण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि परगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल होत आहेत.
पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाडामुळे केवळ एक दोन बसेसमधील बोर्ड बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रमुख बसस्थानकांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक बसेसचे बोर्ड पूर्णपणे बंद होते. यात छोट्या इंद्रधनुष्य बसमध्ये हे बोर्ड बंद असण्याचे प्रमाण जास्त होते. नवीन इलेक्ट्रिक एसी बसचे डिजिटल मार्गदर्शक बोर्ड सुरू असल्याचे आढळून आले.
बस स्टॉपवर उभे असताना लांबून बोर्ड दिसला की तयारी करता येते. आता बस अगदी जवळ आल्यावर नंबर शोधावा लागतो. प्रशासनाला हे साधे बोर्ड दुरुस्त करता येत नाहीत का? - रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ नागरिक
रात्रीच्या वेळी किंवा पावसात बसचे नंबर लांबून अजिबात दिसत नाहीत. डिजिटल बोर्डचा मुख्य फायदा हाच असतो की ते अंधारातही स्पष्ट दिसतात. काही बोर्ड बंद असल्याने बस जवळ आल्यावर धावत जाऊन कंडक्टरला विचारावे लागते, यात अनेकदा बस सुटून जाते.- अंकिता साळुंखे, बस प्रवासी
तांत्रिक अडचणीमुळे एक-दोन बसमधील आयटीएमएस प्रणाली बंद असू शकते.- किशोर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी