हिंजवडी प्रकरण : ‘त्या’ कंपनीची पोलिसांकडून तपासणी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:09 IST2025-03-22T13:08:51+5:302025-03-22T13:09:20+5:30
व्योमा ग्राफिक्स कंपनीने रात्रीत संकेतस्थळ (वेबसाइट) बंद केले असून कर्मचाऱ्यांचे मोबाईलही बंद

हिंजवडी प्रकरण : ‘त्या’ कंपनीची पोलिसांकडून तपासणी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद
वाकड : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क येथील फेज १ मध्ये मिनी बसच्या आगप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी व्योमा ग्राफिक्स कंपनीची तपासणी केली. कंपनीचे मालक नितेश शहा यांना घेऊन परिसराची संपूर्ण पाहणी केली. मुद्रण विभाग, रसायने ठेवण्याची जागा तसेच बाहेरील परिसराच्या नोंदी केल्या. दरम्यान, व्योमा ग्राफिक्स कंपनीने रात्रीत संकेतस्थळ (वेबसाइट) बंद केले असून कर्मचाऱ्यांचे मोबाईलही बंद आहेत.
हिंजवडीतील व्योमा ग्राफिक्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून बुधवारी चौघांचा बळी गेला होता. दिवाळीचा बोनस व पगार कापल्याच्या आणि मजुरांचे काम सांगितल्याच्या रागातून, सहकारी कर्मचाऱ्यांशी असलेल्या वादातून जनार्दन हंबर्डीकर या बसचालकानेच बस पेटवून चार कर्मचाऱ्यांना संपविल्याचे स्पष्ट झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पावणेतीन ते तीनच्या दरम्यान पोलिसांचे पथक कंपनीमध्ये दाखल झाले. पथकाने मुद्रण विभाग, रसायने ठेवण्याची जागा तसेच बाहेरील परिसराची तपासणी केली. यावेळी कंपनीचे मालक नितेश शहा यांच्याकडून पथकाने सर्व माहिती घेतली.
पोलिस पथक आल्याचे समजताच आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर येऊन, खिडकीतून डोकावत होते. पोलिसांनी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या आत कोणालाही येण्यास मनाई केली होती; परंतु रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या बघ्यांमधून अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही घटना अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा उलगडा होताच अनेकांना धक्का बसला. गुरुवारी रात्रीच कंपनीने आपले संकेतस्थळ (वेबसाईट) बंद केले आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींसह इतर सर्वच कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक बंद केले आहेत. कंपनीचे संकेतस्थळ आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद ठेवण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पगार थकवला नसल्याचा कंपनी मालकाचा खुलासा
बसचालक जनार्दन हंबर्डीकर याने सीटखाली कंपनीतील बेंझिन आणि कापडाचे बोळे ठेवून बस पेटवली होती. सहकारी कर्मचाऱ्यांशी असलेला वाद व मालकाने पगार कापल्याच्या आणि बोनस थकवल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे त्याने पोलिस जबाबात सांगितले होते. याबाबत मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश शहा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कंपनीकडून बसचालकाचे कोणतेच पैसे बाकी ठेवलेले नाहीत. सर्व पैसे दिले आहेत. आम्ही पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत आहोत. बसचालकाने कंपनीतील बेंझिनचा वापर केल्याबाबत मात्र काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला.