हॅलो इन्स्पेक्टर: बाहेरख्यालीपणा नडला, मेहुण्याने काटा काढला; रिक्षाच्या बिल्ल्यावरून खून प्रकरणाचा उलगडा झाला
By नारायण बडगुजर | Updated: July 24, 2025 18:43 IST2025-07-24T18:42:15+5:302025-07-24T18:43:05+5:30
- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून केली होती दाजीची हत्या; पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासाने गुन्ह्याची उकल

हॅलो इन्स्पेक्टर: बाहेरख्यालीपणा नडला, मेहुण्याने काटा काढला; रिक्षाच्या बिल्ल्यावरून खून प्रकरणाचा उलगडा झाला
पिंपरी : खेड तालुक्यातील चाकण -वांद्रा रस्त्यावर आसखेड खुर्द येथे ओढ्यालगत चेहरा दगडाने ठेचलेला बेवारस मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ मिळालेल्या रिक्षाच्या बॅजबिल्ल्यावरून ‘क्ल्यू’ मिळाला. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत खुनाच्या गुन्ह्याची उकल केली.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाईट परिसरात आसखेड खुर्द येथे ओढ्यालगत १३ फेब्रुवारी २०२५ रोजी बेवारस मृतदेह आढळला होता. गुन्हे शाखा युनिट ३ आणि महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक दत्ता जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
चेहरा दगडाने ठेचल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, मृतदेह आढळलेल्या परिसरात रिक्षाचा बॅजबिल्ला सापडला. पोलिसांनी त्यावरून शोध घेतला. बिल्ल्यावरून मृतदेहाची ओळख पटविली. खून झालेली व्यक्ती खेड तालुक्यातील असून मुंबई येथे रिक्षा चालवत असल्याची माहिती मिळाली.
नातेवाईकांकडे चौकशी केली असता मृत रिक्षाचालक त्याच्या पत्नीच्या भावासोबत होता अशी माहिती समोर आली. तसेच मुंबई येथील रिक्षाथांब्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात मृत रिक्षाचालक आणि त्याचा मेहुणा तसेच मेहुण्याचा मावस भाऊ हे तिघे सोबत असल्याचे आणि रिक्षात बसून गेल्याचे फुटेजमधून समोर आले. त्यानुसार मेहुणा आणि त्याच्या मावस भावाला पोलिसांनी बोलते केले.
तिघेही रिक्षाचालक
मृत व्यक्ती हा रिक्षाचालक होता. तसेच त्याचा मेहुणा आणि मेहुण्याचा मावस भाऊ हे दोघेही मुंबईत एकाच परिसरात रिक्षाचालवत होते. तसेच त्यांचे कुटुंबही त्याच परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे असायचे.
अनैतिक संबंधांचा संशय
मृत रिक्षाचालकाचे काही महिलांच्या संपर्कात होता. तो बाहेरख्याली आहे, असे मेहुण्याला माहीत झाले. दरम्यान, आपली पत्नीही आपल्या दाजीच्या संपर्कात आहे. ती दाजीच्या रिक्षातून ये-जा करत असल्याचेही मेहुण्याच्या निदर्शनास आले. त्यावरून दाजी आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, असा संशय मेहुण्याला आला. त्यातून त्याने रिक्षाचालक दाजीचा काटा काढण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याने त्याच्या मावस भावाचीही मदत घेतली.
मुंबईतून रिक्षाने येऊन खून
मेहुणा आणि त्याच्या मावस भावाने दाजीला मुंबई येथून रिक्षातून घेऊन आले. त्यानंतर आसखेड खुर्द येथे दगडाने ठेचून दाजीची हत्या केली. दाजीची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रुप केला. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून गुन्ह्याची उकल केली.
मयत व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, परिसरातील गावांमध्ये पथकांनी माहिती घेतली. त्यात रिक्षाच्या बॅजबिल्ल्यावरून ओळख पटली. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित मेहुण्याला आणि त्याच्या मावस भावाला बोलते केले आणि गुन्ह्याची उकल झाली. -नितीन गिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
हॅलो इन्स्पेक्टर कशासाठी?
गुन्हेगारांनी कितीही शिताफीने गुन्हा केला, तरी तो पकडला जातोच, हे सर्वांना समजायला हवे. गुन्हा कसा घडू शकतो, हे लक्षात घेऊन आपण सतर्क राहायला हवे आणि एखाद्या गुन्ह्याचा छडा लागतो कसा, हे कळायला हवे. म्हणून खास मालिका आम्ही सुरू केली आहे. - संपादक