'तू करणी केली आहे...' सासरच्यांकडून विवाहितेला त्रास; उचललं टोकाचं पाऊल
By नारायण बडगुजर | Updated: May 8, 2024 17:25 IST2024-05-08T17:24:43+5:302024-05-08T17:25:52+5:30
नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची सारखी तक्रार करत असतेस, असे म्हणत त्यांनी विवाहितेचा छळ केला

'तू करणी केली आहे...' सासरच्यांकडून विवाहितेला त्रास; उचललं टोकाचं पाऊल
पिंपरी : तू पांढऱ्या पायाची असून तू करणी केली आहे, असे म्हणत सासरच्यांनी विवाहितेला त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल नगर, पिंपळे निलख येथे ४ फेब्रुवारी २०१४ ते ६ मे २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
रवींद्र बाळकृष्ण लंगोटे (३९, रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विशाल अशोक जवळेकर आणि निखील अशोक जवळेकर (दोघे रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासह एका महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र यांच्या बहिणीचा विवाह विशाल जवळेकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती विशाल, दीर निखील आणि अन्य संशयितांनी फिर्यादी रवींद्र यांच्या बहिणीला मानसिक व शारीरिक त्रास दिला. तुझ्या आई वडिलांनी लग्नात मानपान केला नाही. आम्हाला हुंडा दिला नाही. तू पांढऱ्या पायाची आहेस. तू करणी धरणी केल्यामुळे वडील अशोक जवळेकर यांचा मृत्यू झाला. नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची सारखी तक्रार करत असतेस, असे म्हणत त्यांनी विवाहितेचा छळ केला. संशयितांनी विवाहितेला उपाशी ठेवून मारहाण केली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने सोमवारी (दि. ६) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.