पंगतीमधून ये-जा करण्यास हटकल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा; नवरदेवावर कोयत्याने वार
By नारायण बडगुजर | Updated: December 24, 2023 16:44 IST2023-12-24T16:43:48+5:302023-12-24T16:44:49+5:30
‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट टाकीन’, अशी धमकी देत तिघांनी दहशत पसरवली

पंगतीमधून ये-जा करण्यास हटकल्याने हळदीच्या कार्यक्रमात राडा; नवरदेवावर कोयत्याने वार
पिंपरी : हळदीच्या कार्यक्रमातील पंगतीमधून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना हटकले. त्याचा राग आल्याने तिघांनी नवरदेवावर कोयत्याने वार केले. ‘‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट टाकीन’’, अशी धमकी देत तिघांनी दहशत पसरवली. रहाटणीतील श्रीनगरमधील जय भवानी चौकात शुक्रवारी (दि. २२) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
रोहीत प्रकाश गायकवाड (२९, रा. जयभवानी चौक, श्रीनगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २३) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विजय राहुल तलवारे (२२, रा. काळेवाडी), सनी राजीव गायकवाड (२३), अनिकेत बापू बनसोडे (२४, दोघेही रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहीत गायवाकड यांचा शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारस एका दुचाकीवरून तीन संशयित व्यक्ती जेवणाच्या पंगतीमधून ये-जा करत होते. त्यांना पंगतीमधून ये-जा करण्यास मनाई केली. त्याचा राग आल्याने संशयितांनी सुरवातीला बाचाबाची केली. त्यानंतर तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने संशयित पुन्हा तेथे आले. त्यांच्या हातामध्ये लोखंडी कोयता, लोखंडी राॅड, होता. त्यांनी फिर्यादी राेहीत गायकवाड यांचा मामेभाऊ शक्ती बनसोडे याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी राेहीत यांनी त्यास जोरात धक्का दिल्याने तो जमिनीवर पडला. त्यामुळे संशयित विजय तलवारे याने जिवेठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी रोहीत यांच्या डोक्यात वार केला असता रोहीत यांनी वार डाव्या हातावर घेतला. त्यामुळे रोहीत यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर दुखापत झाली. तसेच संशयितांनी त्यांच्याकडील लोखंडी राॅड, कोयते हवेमध्ये फिरवून तेथे असलेल्या लोकांना कोयत्याची भीती दाखविली. ‘‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट टाकीन’’ असे बोलत दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक शंतून नाईक निंबाळकर तपास करीत आहेत.