LPG Crisis: आखाती युद्धाची पिंपरी-चिंचवडला झळ; व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 17:57 IST2026-03-07T17:56:30+5:302026-03-07T17:57:42+5:30

- हॉटेल व्यवसायासह कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता; सध्या उपलब्ध सिलिंडरचा साठा घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी राखीव, घरगुती गॅसपुरवठा सुरळीत, दोन गॅसची जोडणी स्थगित

Gulf War hits Pimpri-Chinchwad; Commercial LPG gas supply stopped | LPG Crisis: आखाती युद्धाची पिंपरी-चिंचवडला झळ; व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा बंद

LPG Crisis: आखाती युद्धाची पिंपरी-चिंचवडला झळ; व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा बंद

पिंपरी : आखाती युद्धाची झळ आता पिंपरी-चिंचवड शहरालाही बसू लागली आहे. घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा शुक्रवार (दि. ६)पासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल, कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांना होणारा गॅसपुरवठा ठप्प झाल्याने उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती पंपचालकांकडून देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात चाकण येथील हिंदुस्थान पेट्रोलियम, शिक्रापूर येथील भारत पेट्रोलियम तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून गॅसचा पुरवठा केला जातो. आखाती युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस वितरकांना पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या उपलब्ध असलेला सिलिंडरचा साठा घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी राखून ठेवण्यात आला आहे.

शुक्रवारी वितरकांकडे शिल्लक असलेल्या व्यावसायिक सिलिंडरचे वाटप करण्यात आले. मात्र, पुढील पुरवठा कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचे शहरातील गॅस वितरकांनी सांगितले.

दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वाटप बंद असले तरी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या वितरणावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात सीएनजी पंपांवर गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती सीएनजीपंपधारकांनी दिली.

आमच्या एजन्सीमधून हॉटेल आणि कंपन्यांसाठी दररोज सुमारे १०० ते १५० गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. मात्र, शुक्रवारपासून हे वाटप बंद करण्याच्या सूचना चाकण येथील हिंदुस्थान पेट्रोलियमकडून मिळाल्या आहेत. घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, व्यावसायिक सिलिंडरचे वाटप अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. - श्याम काळोखे, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर वितरक, भोसरी

 

सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. एकच कनेक्शन असलेल्या ग्राहकांना २१ दिवसांनी तर दोन कनेक्शन असलेल्यांना ३० दिवसांनी नवीन बुकिंग करावे लागणार आहे. नवीन कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू असून, दोन कनेक्शन देणे सध्या तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. - आतिश कांबळे, घरगुती एलपीजी गॅस वितरक, चिंचवडगाव

Web Title : खाड़ी युद्ध का पिंपरी-चिंचवड पर असर: व्यावसायिक एलपीजी आपूर्ति बाधित।

Web Summary : खाड़ी युद्ध के कारण पिंपरी-चिंचवड में एलपीजी की कमी। घरेलू जरूरतों को प्राथमिकता देने के लिए व्यावसायिक गैस आपूर्ति रोकी गई, जिससे व्यवसायों पर असर। सीएनजी आपूर्ति अप्रभावित।

Web Title : Gulf War hits Pimpri-Chinchwad: Commercial LPG supply halted.

Web Summary : Pimpri-Chinchwad faces LPG shortage due to the Gulf War. Commercial gas supply is stopped to prioritize domestic needs, impacting businesses. CNG supply remains unaffected.