गुगल सर्च करून आखला ‘प्लॅन’;बेरोजगार उच्चशिक्षिताकडून बंदुकीच्या धाकावर चोरीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:12 IST2025-08-05T20:11:58+5:302025-08-05T20:12:33+5:30
सांगवीतील घटनेने खळबळ : दोन भावांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

गुगल सर्च करून आखला ‘प्लॅन’;बेरोजगार उच्चशिक्षिताकडून बंदुकीच्या धाकावर चोरीचा प्रयत्न
पिंपरी : बेरोजगार असलेल्या उच्चशिक्षिताने बंदुकीच्या धाकावर चोरी करण्याचा प्रयत्न केला. सांगवीतील पिंपळे गुरव येथील कल्पतरू इस्टेट फेज तीनमध्ये ३१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
चांगबोई सेरतो कोम (४०, रा. एनआयबीएम कोंढवा, मूळ रा. मणिपूर), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. गगन सीताराम बडेजा यांनी याबाबत सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेला चांगबोई याला दरमहा एक लाख ३० हजार रुपये पगाराची आयटी कंपनीत नोकरी होती. मात्र, नोकरी गेल्याने ऑगस्ट २०२४ पासून तो बेरोजगार होता. चांगल्या पगाराची नोकरी असल्याने त्याने कोंढवा आणि उंड्री पिसोळी येथे फ्लॅट घेतला होता. दोन्ही फ्लॅटचे हप्ते सुरू आहेत. दरम्यान, वर्षभरापासून नोकरी नसल्याने बेरोजगार असलेला चांगबोई कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चोरीचा प्रयत्न केला.
फिर्यादी गगन यांचे वडील सीताराम बडेजा हे कोंढवा येथील बँकेच्या शाखेत व्यवस्थापक आहेत. चांगबोई याने सीताराम यांचा पाठलाग करून त्यांच्या घरावर पाळत ठेवली. त्यानंतर ३१ जुलै रोजी सायंकाळी त्यांच्या घरी गेला. त्याने बडेजा यांच्या घराची बेल वाजवली. गगन यांच्या आईने दरवाजा उघडला, पण बाहेर कुणीच दिसले नाही. काही मिनिटांनी पुन्हा बेल वाजली. गगन यांनी दरवाजा उघडला. चोरटा चांगबोई समोर उभा होता.
‘सीताराम बडेजा का पार्सल आया है. उनका आईडी कार्ड दिखाओ’, असे म्हणाल्याने गगन यांनी आयकार्ड आणण्यासाठी घरात जात असताना चांगबोई घरात शिरला. गगन यांनी त्याला हटकले. काही कळायच्या आत चांगबोईने बॅगेतून बंदूक काढली आणि गगन यांच्या कपाळाला लावली. घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने आणण्यास सांगितले. हॉलमध्ये काहीतरी सुरू आहे, म्हणून बेडरूमध्ये असलेला गगन यांचा भाऊ बाहेर आला, चांगबोईने बंदुक त्याच्या दिशेने धरली. त्यामुळे गगन आणि त्यांचा भाऊ घाबरला होता. तिघांमध्ये जोरदार झटापट झाली. दोन्ही भावांनी प्रतिकार केला. चांगबोईने कंबरेला असलेली कुकरी काढली. हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांच्यात झटापट झाली. अखेर गगन आणि त्यांच्या भावाने चांगबोईला धरून हात पाय बांधले. याबाबत माहिती मिळताच सांगवी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत चांगबोईला ताब्यात घेतले. पोलिसांनी गगन आणि त्यांच्या भावाच्या धाडसाचे कौतुक केले.
तीन महिन्यांपासून पाळत
चांगबोई याने तीन महिन्यांपूर्वी सीताराम बडेजा यांचा पाठलाग करून ते कुठे राहतात याची पाहणी केली होती. त्यानंतर ३१ जुलैला तो बसने नाशिक फाट्यापर्यंत आला. तेथून रिक्षाने थेट सोसायटीत गेला. सहाव्या मजल्यापर्यंत चालत गेला. घराच्या बाहेर दारू प्यायला. त्यानंतर त्याने बडेजा यांच्या घराची बेल वाजवली, असे पोलिसांनी सांगितले.
गुगल सर्च करून आखला ‘प्लॅन’
बेरोजगार असल्याने चांगबोई याला पैशांची चणचण होती. त्यामुळे मोठी रक्कम मिळवण्यासाठी त्याने चोरीचा प्लॅन आखला. त्यासाठी पैसे कुठे असतात याबाबत गुगल सर्च करून माहिती घेतली. त्यावेळी बँकांमध्ये आणि लाॅकरमध्ये जास्त पैसे असतात, अशी माहिती त्याने मिळवली. त्यानुसार त्याने तो रहात असलेल्या कोंढवा परिसरातील बँकांमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी एका बँकेत सीताराम बडेजा त्याला दिसले. त्यांच्या घरी रोकड तसेच मौल्यवान वस्तू असतील असे त्याला वाटले.
बंदूक, १९ काडतुसे आणि कुकरी जप्त
पोलिसांनी चांगबोई याच्याकडेन बंदुक, १९ काडतुसे आणि कुकरी जप्त केली. या बंदुकीसाठी मणिपूर येथील परवाना असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच हातबाॅम्ब (हॅण्डग्रेनेड) सारखे इलेक्ट्रिक वायर लावलेले प्लास्टिकच्या पाईपचे तीन ते चार तुकडे देखील चांगबोईकडे मिळून आले. गगन आणि त्यांच्या भावाने चांगबोईचा प्रतिकार केला. चांगबोईवर याआधी गुन्हा दाखल नाही. आता तो येरवडा कारागृहात आहे. - अमोल नांदेकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सांगवी