GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा
By प्रकाश गायकर | Updated: January 25, 2025 11:02 IST2025-01-25T11:01:45+5:302025-01-25T11:02:48+5:30
महिलेला दाखल करतेवेळीच फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरलेले होते, त्यामध्ये जीबीएसची लागण झाली

GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा
पिंपरी : गुलियन बॅरो सिंड्रोम (जीबी सिंड्रोम) ची लागण झालेल्या एका ६४ वर्षीय महिलेचा संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेला जी बी सिंड्रोमची लागण झाली असली तरी तिचा मृत्यू न्यूमोनिया या आजाराने झाला असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.
एका ६४ वर्षीय महिलेला येथील खासगी रुग्णालयामध्ये १७ नोव्हेंबरला दाखल केले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर २४ नोव्हेंबरला डॉ. डी वाय पाटील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. या रुग्णाला न्यूमोनियाचा त्रास होता. तसेच आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर २९ डिसेंबरला या महिलेला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दाखल करतेवेळीच फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरलेले होते. त्यामध्ये जी बी सिंड्रोमची लागण झाली. मंगळवारी (दि. २१) या महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, तिचा मृत्यू न्यूमोनिया या आजाराने झाला असल्याचे स्पष्टीकरण वायसीएम रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.
आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये १२ रुग्णांना जी बी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ६ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला असून ५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका ६४ वर्षीय महिलेला २९ डिसेंबरला रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता. तसेच जी बी सिंड्रोमची ही लागण झाली. २१ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू न्यूमोनिया या आजारामुळे झाला आहे. - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.