शस्त्र परवाना मंजूर करून देण्याच्या बहाण्याने १० लाखांची फसवणूक; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:00 IST2022-02-19T16:50:06+5:302022-02-19T17:00:39+5:30
पाषाण व वाकड येथे मुंबई -बेंगळुरू महामार्गावर २०१८ मध्ये हा प्रकार घडला...

शस्त्र परवाना मंजूर करून देण्याच्या बहाण्याने १० लाखांची फसवणूक; पुण्यातील घटना
पिंपरी : मंत्रालयात ओळख असून नामंजूर झालेला हत्यार परवाना मिळवून देतो, असे सांगून एकाची १० लाख रुपयांची फसवणूक केली. पाषाण व वाकड येथे मुंबई -बेंगळुरू महामार्गावर २०१८ मध्ये हा प्रकार घडला.
योंगेंद्र रतीलाल गांधी (वय ५४, रा. वानवडी, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. माधव भुजंगराव गवळी (वय ३५, रा. चिपळूण, जि. रत्नागीरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या तोंड ओळखीचा आहे. फिर्यादीने शस्त्र परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र अर्ज नामंजूर झाला. ही बाब आरोपीला माहीत झाली.
मंत्रालयात माझी ओळख आहे, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. नामंजूर झालेला हत्यार परवाना अपिलात मंत्रालयात मुंबई येथून मंजूर करून देतो, असे सांगून आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यासाठी पाच लाख रुपये ॲडव्हान्स व परवाना मंजुर झाल्याचे सांगून पाच लाख रुपये रोख, असे एकूण १० लाख रुपये आरोपीने फिर्यादीकडून घेतले.
मात्र हत्यार परवाना नामंजूर झाल्यानंतर फिर्यादीने दिलेले १० लाख रुपये आरोपीकडे परत मागितले. ती रक्कम परत करण्याबाबत आरोपीने त्यांना वेळोवेळी आश्वासन दिले. मात्र ती रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव येलमार तपास करीत आहेत.