'तुझ्यासाठी पाच वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस’, पिंपरीत महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:53 IST2022-02-14T14:52:54+5:302022-02-14T14:53:01+5:30
आरोपीने ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली

'तुझ्यासाठी पाच वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस’, पिंपरीत महिलेचा विनयभंग
पिंपरी : तुझ्यासाठी पाच वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस, असे म्हणून मायलेकीचा विनयभंग केला. तसेच ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. चिंचवड येथे २०१८ पासून १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
चरणदास महादेव खडसे (वय ४५, रा. दत्तनगर, चिंचवड), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांच्या मुलीकडे पाहून आरोपी हा अश्लील वर्तन करत होता. हा प्रकार वारंवार होत असल्याने फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय आरोपीकडे विचारणा करण्यासाठी गेले. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची आरोपीने धमकी दिली. आरोपीने रविवारी (दि. १३) सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी महिलेला धमकी दिली. तू माझी नाही झालीस तर मी तुला कोणाची होऊ देणार नाही, असे म्हणून त्याने धमकी दिली.
तूमचं वय काय, तुम्ही असं का बोलता, असे म्हणून फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्याला शिवीगाळ करून ढकलून दिले. त्यानंतर आरोपीने पुन्हा अश्लील वर्तन करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तुझ्यासाठी मी पाच वर्ष घालवले. तू माझी झाली पाहिजे, असे म्हणून आरोपीने पुन्हा फिर्यादी महिला आणि तिच्या मुलीचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे तपास करीत आहेत.