गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 00:03 IST2025-11-14T00:02:35+5:302025-11-14T00:03:32+5:30
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात संशयितांनी कारमध्ये गोळी झाडून नितीन गिलबिले यांचा खून केल्याचे दिसत आहे.

गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
पिंपरी : चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील खडी मशीन रस्त्यावर एका व्यावसायिकाला कारमध्ये बसवून त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणातील संशयित पळून गेले असून त्यांच्या शोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.
नितीन शंकर गिलबिले (वय ३८, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन यांचे भाऊ सचिन शंकर गिलबिले (वय ४०) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित जीवन पठारे (रा. पठारे मळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) यांच्या विरोधात गुरुवारी (दि. १३ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीन गिलबिले हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांनी मागील काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर हॉटेल देखील सुरू केले होते. व्यावसायिक गाळे बांधून ते भाड्याने दिले होते. बुधवारी सायंकाळी नितीन खडी मशीन रस्त्यावर काही लोकांसोबत बोलत थांबले होते. त्यावेळी संशयित कार घेऊन आले. त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि नितीन यांच्या हॉटेलच्या दिशेने निघून गेले. संशयितांनी नितीन यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयितांनी नितीन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत टाकून पळून गेले. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, या प्रकरणातील संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दिघी पोलिस आणि गुन्हे शाखेची पाच पथके संशयितांच्या मागावर पाठवण्यात आली आहेत. लवकरच संशयितांना अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली घटना
दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संशयितांनी कारमध्ये गोळी झाडून नितीन गिलबिले यांचा खून केला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला नितीन यांचा मृतदेह टाकून संशयित कार घेऊन पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे.