Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 21:21 IST2021-11-30T21:20:36+5:302021-11-30T21:21:07+5:30
एमआयडीसीच्या हिंजवडी फेज एकमधील अग्निशामक केंद्राचा एक, पीएमआरडीएच्या अग्निशामक केंद्राचा एक तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे तीन, असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले

Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी
पिंपरी : अचानक आग लागून फर्निचर, गादी कारखाना, स्टेशनरी तसेच स्नॅक्स सेंटर, अशी चार दुकाने खाक झाली. यात एक महिला जखमी झाली. तर दुकानांतील साहित्य आदी खाक होऊन ५० लाखांपर्यंतचे नुकसान झाले. वाकड येथे दत्त मंदिरासमोर मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील दत्त मंदिरासमोर पत्राशेडमध्ये दुकाने आहेत. तेथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. दुकानांतील फर्निचर, गादी, स्टेशनरीमुळे आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशामक दलाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार एमआयडीसीच्या हिंजवडी फेज एकमधील अग्निशामक केंद्राचा एक, पीएमआरडीएच्या अग्निशामक केंद्राचा एक तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे तीन, असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर निंयत्रण मिळवले. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.