शेतकऱ्यांनी केला पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद; पवना धरणाजवळ पोलीस बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:01 IST2023-05-09T13:00:54+5:302023-05-09T13:01:03+5:30
आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत पवनाधरणाचे पाणी पिंपरी चिंचवड शहराला देणार नाही, शेतकऱ्यांची ठोस भूमिका

शेतकऱ्यांनी केला पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद; पवना धरणाजवळ पोलीस बंदोबस्त
पवनानगर: पवनाधरणग्रस्त शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा बंद केला आहे. आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पवनाधरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी आज दि.९ रोजी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा बंद केला असून आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही. तो पर्यंत पवनाधरणाचे पाणी पिंपरी चिंचवड शहराला देणार नाही. अशी ठोस भूमिका घेतली असुन पवनाधरण पाणी पुरवठा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयातुन बाहेर काढून कार्यालय बंद केले आहे.
यावेळी मावळचै आमदार सुनील शेळके, भाजपाचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गणेश खांडगे,किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार,काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ,ज्ञानेश्वर दळवी,गणेश धानिवले, लक्ष्मण भालेराव, संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके,रविकांत रसाळ,मुकुदराज काऊर,किसन घरदाळे, यांच्या सह मोठ्या प्रमाणावर आंदोलक असून यावेळी आंदोलन घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मावळ चे तहसीलदार विक्रम देशमुख, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपभियंता अशोक शेटे,पवना अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजितकुमार राजगिरे शासनाच्या वतीने चर्चा करण्यासाठी पवनाधरणग्रस्त शेतकऱ्यांना भेट घेण्यासाठी आले आहे.