अत्यंत दुर्दैवी! शॉक बसून ते रस्त्यावर पडले अन् डोक्यावरून ट्रकचे चाक गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 16:36 IST2020-10-21T16:35:51+5:302020-10-21T16:36:35+5:30
रस्ता ओलांडत असताना दुभाजकावरील विद्युत खांबाला हात लागल्याने शॉक बसून एक व्यक्ती रस्त्यावर पडली..

अत्यंत दुर्दैवी! शॉक बसून ते रस्त्यावर पडले अन् डोक्यावरून ट्रकचे चाक गेले
पिंपरी : रस्ता ओलांडत असताना दुभाजकावरील विद्युत खांबाला हात लागल्याने शॉक बसून एक व्यक्ती रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून आलेल्या ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना धावडेवाडी, भोसरी येथे घडली. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक झाली असून, महावितरणच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रवी महादेव जोगदंड (वय ४५, रा. पत्राचाळ, अजिंठा नगर, निगडी) यांचा विचित्र अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. विठ्ठल लक्ष्मण राठोड (वय ३४, रा. उंब्रज, ता. कराड, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील धावडे वस्ती येथील रोशल गार्डन समोर १९ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. जोगदंड रस्ता ओलांडत असताना दुभाजकावरील विद्युत खांबाच्या उघड्या वायरला त्यांचा स्पर्श झाला. शॉक बसल्याने ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. धीरज महादेव जोगदंड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.