पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात जोरदार कारवाई केली आहे. १५ डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ३७० गुन्हे दाखल करून सुमारे ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे एक्साइजचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात २१ विशेष पथके तैनात आहेत. तसेच एक्साइजकडून निवडणूक आचारसंहिता कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. यात अवैध दारु धंद्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अवैध दारुधंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.पुणे महापालिका क्षेत्रात २१० गुन्हे
पुणे महापालिका हद्दीत केलेल्या कारवायांमध्ये एकूण २१० गुन्ह्यांची नोंद करून ३४५ संशयितांना अटक, तर ३३ वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत एक कोटी ७० लाख ११ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये गावठी दारू, देशी-विदेशी मद्य, ताडी, स्कॉच, परराज्यातील व बनावट मद्याचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये ९३ गुन्हे
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात केलेल्या कारवायांमध्ये ९३ गुन्हे दाखल करून १२९ संशयितांना अटक केली. तसेच सात वाहने जप्त केली. या कारवायांमध्ये दोन कोटी २९ लाख १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ९३ अंतर्गत सराईत आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. पुणे महापालिका क्षेत्रात १३ प्रस्ताव, तर पिंपरी-चिंचवडमध्ये आठ प्रस्ताव सक्षम दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले असून, त्यापैकी चार आरोपींकडून दोन लाख २० हजार रुपयांची बंधपत्र रक्कम वसूल केली आहे.
तीन दिवस ‘ड्राय डे’
निवडणुका मुक्त, निर्भय व शांततेत पार पडाव्यात, तसेच मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १४, १५ व १६ जानेवारी २०२६ रोजी सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अवैध मद्यविरोधी कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी माहिती द्यावी. -अतुल कानडे, अधीक्षक, एक्साइज, पुणे