वृद्ध दाम्पत्याच्या किरकोळ वादातून पत्नीचा खून; पतीने स्वत:वरही केले वार, बावधनमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 10:25 AM2024-03-07T10:25:50+5:302024-03-07T10:26:27+5:30

पती ७९ वर्षांचे असून पत्नी ७५ वर्षांच्या आहेत, त्यांच्यात झालेल्या कोरकोळ वादातून पतीने पत्नीचा खून केला

Elderly couple murders wife over petty dispute Husband also stabbed himself incident in Bavdhan | वृद्ध दाम्पत्याच्या किरकोळ वादातून पत्नीचा खून; पतीने स्वत:वरही केले वार, बावधनमधील घटना

वृद्ध दाम्पत्याच्या किरकोळ वादातून पत्नीचा खून; पतीने स्वत:वरही केले वार, बावधनमधील घटना

पिंपरी : वृद्ध दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर पतीने कोयत्याने वार करून पत्नीचा खून केला. तसेच स्वत:वर देखील कोयत्याने वार केले. यात तो जखमी झाला. बावधन येथे मंगळवारी (दि. ५) सायंकाळी सात ते बुधवारी (दि. ६) सकाळी सात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. 

आशा जैन (वय ७५), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महेंद्र दयालचंद जैन (७९, रा. बावधन, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप सुभाषचंद्र जैन (५७, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा जैन या महेंद्र जैन यांच्या पत्नी होत्या. ते दोघेही जावई संदीप जैन यांच्याकडे २०१८ पासून राहवयास आहेत. 

दरम्यान, महेंद्र आणि आशा यांच्यात गावी जाण्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास महेंद्र आणि आशा हे दोघेही त्यांच्या खोलीत झोपण्यास गेले. त्यानंतर  महेंद्र यांनी घराच्या बागेतील कामाकरीता आणलेल्या कोयत्याने पत्नी आशा यांच्यावर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या आशा यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महेंद्र यांनी स्वत:वर देखील कोयत्याने वार केले. त्यामुळे ते देखील जखमी झाले. 

फिर्यादी संदीप हे बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास बाहेरून फिरून आले. त्यानंतर त्यांची पत्नी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे वडील महेंद्र आणि आई आशा यांना उठवण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये गेल्या. त्यावेळी त्यांचे वडील महेंद्र आणि आई आशा हे दोघेही जखमी अवस्थेत दिसून आले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आशा यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. 

याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त डाॅ. विशाल हिरे, हिंजवडीचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, सहायक निरीक्षक राम गोमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.

Web Title: Elderly couple murders wife over petty dispute Husband also stabbed himself incident in Bavdhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.