पिंपरी मंडईसमोरील महापालिकेच्या जागेची कागदपत्रे गायब?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:00 IST2026-03-12T15:45:08+5:302026-03-12T16:00:18+5:30
भूमी व जिंदगी विभागाने नगररचना विभागाकडे मागितली माहिती

पिंपरी मंडईसमोरील महापालिकेच्या जागेची कागदपत्रे गायब?
पिंपरी : पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईच्या समोरील महापालिकेचे पार्किंग, पिंपरी पोलिस चौकी आणि पिंपरी रेल्वे स्थानकाबाहेरील फळबाजार ते मुख्य बाजारपेठ रस्त्यादरम्यान असलेल्या मोकळ्या जागेची कागदपत्रेच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कागदपत्रे मिळत नसल्याने खळबळ उडाली आहे. या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या माफियामार्फत येथे बेकायदा दुचाकी पार्किंग सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचा मोठा भाग व जागा हडपल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून होत आहे.
या बेकायदा पार्किंगबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाने या जागेची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. संबंधित जागेची मालकी, आराखडे व कागदपत्रांबाबत नगररचना विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, त्या विभागाकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे भूमी व जिंदगी विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले.
या जागेच्या काही भागात सध्या पोलिस चौकीही कार्यरत आहे. परिसरात फळबाजार आणि इतर व्यावसायिक दुकाने सुरू आहेत. येथे शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने या जागेला महत्त्व आले आहे. त्यामुळे जागेच्या मालकीचे व कागदपत्रांचे सत्य स्पष्ट करणे महापालिकेसाठी आवश्यक ठरत आहे. पिंपरी भाजीमंडई परिसरातील ही जागा महापालिकेचीच असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने पुढील कारवाईत अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिका अधिकाऱ्यांना ‘मोठा वाटा’
मागील अनेक वर्षापासून या जागेवर अतिक्रमण झाले असून यातून माफिया लाखो रुपये कमावत आहे. त्यातील ‘मोठा वाटा’ प्रत्येक महिन्याला महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना मिळत असल्याचे येथील व्यापारी सांगतात. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या जागेकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याचे सांगितले जात आहे. भूमी व जिंदगी विभागात एक अधिकारी मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून होता. त्याचेही या गोरखधंद्याला पाठबळ होते, असेही बोलले जात आहे.
पिंपरी भाजी मंडई परिसरातील जागा महापालिकेच्या मालकीची आहे. या जागेची माहिती नगररचना विभागाकडे मागितली आहे. - सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी व जिंदगी विभाग, महापालिका
पिंपरी बाजारातील जागेबाबत भूमी व जिंदगी विभागाने मागणी केलेल्या माहितीचा शोध घेतला जाईल. त्यांना आवश्यक असलेली माहिती दिली जाईल. - संदेश खडतरे, सहसंचालक, नगररचना विभाग, महापालिका