पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. पवना धरणातून पंधरा हजार क्यूसेक्सने वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पवना नदी व नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे सुमारे एक हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शाळा, महापालिकेच्या इमारती व सार्वजनिक ठिकाणी तात्पुरते निवारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या शाळा, सभागृह व इमारतींमध्ये विस्थापितांसाठी तात्पुरती निवासव्यवस्था तसेच अन्न व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आपत्कालीन पथक मध्ये सज्ज ठेवण्यात आले आहे. अद्याप काही भागात स्थलांतराची गरज भासलेली नाही. टाउन हॉल परिसरात जेसीबी व मजुरांची तुकडी तैनात असून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पुरवली जाणार आहे.
प्रशासनाचा इशारा
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने पवना नदीच्या पात्रातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांचा आक्रोश
स्थलांतरित झालेल्या एका महिलेने सांगितले, “आम्ही रात्री उशिरापर्यंत घरात होतो; पण पाणी झपाट्याने आत घुसू लागल्याने घाईघाईने बाहेर पडावे लागले. महापालिकेने वेळेवर मदत केली नसती, तर परिस्थिती बिकट झाली असती.”
स्थानांतरित भाग व नागरिकांची संख्या (बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत)
परिसर स्थलांतरित नागरिक
संजय गांधी नगर, पिंपरी : अंदाजे ७५ रहिवासी (३० जण कमला नेहरू शाळेत ठेवले, उर्वरित नातेवाईकांकडे)पिंपळे निलख, पंचशील नगर : २५ नागरिक महापालिका शाळेतपिंपळे गुरव, लक्ष्मीनगर : ४५ नागरिक महापालिका शाळेतरामनगर, बोपखेल : ४० नागरिक महापालिका शाळेतचिंचवडगाव (सुरेश भोईर कार्यालयाजवळ): ४० नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूवैभवनगर, पिंपरी : पंचशीलनगरातील ५ कुटुंबे (१४ जण) व लक्ष्मीनगरातील १२ कुटुंबे (३४ जण) स्थलांतरितकिवळे परिसर : सुमारे ३०० बांधकाम मजूर म्हाडा इमारतीत; उर्वरितांचे स्थलांतर सुरूभाटनगर : सुमारे १५० कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवली