Pune Crime| मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 15:00 IST2022-01-25T14:55:49+5:302022-01-25T15:00:51+5:30
पैसे दिले नाहीत तर मी अजून तुमच्या मित्रांना तुमचे फोटो व्हायरल करील, अशी धमकीही आरोपीने दिली...

Pune Crime| मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून बदनामी
पिंपरी : मित्राच्या पत्नीसोबत अश्लील फोटो एडिट करून व्हाट्सअपवर पाठवून बदनामी केली. तसेच पैसे दिले नाही तर फोटो आणखी व्हायरल करण्याची धमकी दिली. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ ते २४ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने सोमवारी (दि. २४) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर आरोपीने वेळोवेळी फोन करून तीन व पाच हजार रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पैसे दिले नाहीत. त्यामुळे आरोपीने फिर्यादीच्या मित्राची पत्नी आणि फिर्यादी यांचा अश्लील फोटो एडिट केला. फिर्यादीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील १५ नंबरवरील व्हाट्सअपवर एडिट केलेला फोटो पाठवून आरोपीने बदनामी केली. पैसे दिले नाहीत तर मी अजून तुमच्या मित्रांना तुमचे फोटो व्हायरल करील, अशी धमकीही आरोपीने दिली.
दरम्यान, फिर्यादी पुरुषाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार खंडणी/आयटी ॲक्ट अन्वये याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.