केबलचे काम करताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू, कंपनीने सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यास केला हलगर्जीपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 13:15 IST2021-05-09T13:15:08+5:302021-05-09T13:15:13+5:30
कंपनीच्या सुपरवायझरसह कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल

केबलचे काम करताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू, कंपनीने सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यास केला हलगर्जीपणा
पिंपरी: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर केबलचे काम करत असताना खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीच्या सुपरवायझरसह कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाज कॉलनी आकुर्डी येथे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
रुपेश मोहन देवकर (वय २९, रा. खराळवाडी), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम बाळासाहेब गलांडे (वय २६, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे. गॅझॉन कंपनीचे सुपरवायझर आशिष जैन, तसेच कॉन्ट्रॅक्टर नंदलाल शिवभगवान पारीख (रा. बजाज कॉलनी, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष जैन यांनी दिलेल्या आदेशानुसार गलांडे व त्यांचे मित्र वसंत बाबाजी भोर (वय ३१, रा. चिखली) तसेच रुपेश देवकर हे पारीख यांच्या इमारतीवर केबल फिरवण्याचे काम करत होते. एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर केबल नेण्यात येत होती. त्यावेळी रुपेश देवकर याचा तोल जाऊन तिसऱ्या मजल्याच्या टेरेस वरून खाली पडला. यात गंभीर जखमी झाल्याने रुपेश देवकरचा मृत्यू झाला. सुरक्षिततेसाठी लागणारे कोणत्याही प्रकारचे साहित्य कंपनीने उपलब्ध करून न देता हलगर्जीपणा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.