पिंपरीत रिक्षाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:29 IST2018-05-18T14:29:08+5:302018-05-18T14:29:08+5:30
भरधाव रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचारी महिलेचा मृत्यू झाला.

पिंपरीत रिक्षाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
पिंपरी : भरधाव रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी येथे घडली. शीला कदम (वय ४०, रा. बौद्धनगर, पिंपरी), असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम या सकाळी नऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर पायी जात होत्या. आंबेडकर कॉलनी येथील रिव्हर रोडने जात भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने कदम यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.