Pimpri Chinchwad: लॉजमध्ये प्रियकराने वार केलेल्या ‘त्या’ प्रेयसीचा मृत्यू; प्रियकरानेही संपवलं होत जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 13:42 IST2024-10-13T13:42:23+5:302024-10-13T13:42:55+5:30
प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

Pimpri Chinchwad: लॉजमध्ये प्रियकराने वार केलेल्या ‘त्या’ प्रेयसीचा मृत्यू; प्रियकरानेही संपवलं होत जीवन
पिंपरी : प्रेयसीवर चाकूने हल्ला करत प्रियकराने स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी चार वाजता पिंपरीतील एका लॉजमध्ये घडली. जखमी झालेल्या प्रेयसीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रियकराने प्रेयसीवर नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नीतेश नरेश मिनेकर (३४, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतेश हा २८ वर्षीय तरुणीसोबत गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरीतील एका हॉटेलमध्ये आला होता. काहीवेळाने त्यांच्या खोलीमधून तरुणीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ११२ क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी, दरवाजा वाजवत, आम्ही पोलिस आहोत, दरवाजा उघडा, असे सांगितले. त्यानंतर नीतेश याने, पाच मिनिट थांबा, उघडतो दरवाजा, असे सांगितले. मात्र, काही वेळ जाऊनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. नीतेशने पंख्याला गळफास घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तर, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पोलिसांनी तातडीने तरुणीला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, काही तासांतच तिचा मृत्यू झाला. नीतेश याने तरुणीवर हल्ला का केला, तसेच स्वत: गळफास का घेतला, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.