तळवडे दुर्घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; आतापर्यंत ९ महिलांनी गमावला जीव
By नारायण बडगुजर | Updated: December 10, 2023 16:31 IST2023-12-10T16:31:04+5:302023-12-10T16:31:47+5:30
स्फोटाच्या दुर्घटनेतील उर्वरित सात रुग्णांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक चिंतेत

तळवडे दुर्घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; आतापर्यंत ९ महिलांनी गमावला जीव
पिंपरी : तळवडे येथील स्पार्कल कँडल बनविणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. या दुर्घटनेतील जखमींवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादम्यान शनिवारी दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ रविवारी दुपारी आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊ झाला.
शिल्पा गणेश राठोड (वय ३१), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तळवडे येथील कंपनीत अचानक आग लागून स्फोट झाला. शिवराज एंटरप्रायजेस या कंपनीत शुक्रवारी दुपारही ही दुर्घटना झाली. यात सहा महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर दहाजण जखमी झाले. जखमींवर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी उपचारादरम्यान प्रतीक्षा तोरणे (वय १६) आणि कविता राठोड (वय ३५) यांचे शनिवारी तर शिल्पा राठोड यांचे रविवारी (दि. १०) निधन झाले. उर्वरित सात रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाच्या दुर्घटनेतील उर्वरित सात रुग्णांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत. महापालिकेकडून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.