हेल्मेट नसल्याने डाेक्याला मार लागून दुचाकीचालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 16:07 IST2019-06-16T16:06:45+5:302019-06-16T16:07:48+5:30
हेल्मेट परिधान न केल्याने दुचाकीचालकाचा दुभाजकला धडकून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला.

हेल्मेट नसल्याने डाेक्याला मार लागून दुचाकीचालकाचा मृत्यू
पिंपरी : पुलावरील रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक आणि एक जण गंभीर जखमी झाला. ३ जून रोजी पहाटे हा अपघात झाला होता. उपचारा दरम्यान ६ जून रोजी मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला. हेल्मेट परिधान केले नसल्याने डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय किरण मेदनकर (वय २३, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या मोटारसायकल चालकाचे नाव आहे. तेजस विकास गोपाळे (वय २९, रा. स्पाईन रोड, मोशी) असे जखीम झालेल्याचे नाव आहे. दिग्विजय मेदनकर आणि त्याचा मित्र तेजस गोपाळे हे दोघेही दि. ३ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास भूक लागली म्हणून भोसरी येथे खाण्यासाठी जाण्यास निघाले. मेदनकर याने त्याच्याकडील मोटारसायकलवरून (क्र. एमएच १४ ईटी ८०७०) जायचे असू सांगून मित्र गोपाळे याला मोटारसायकलवर पाठीमागे बसविले. दोघेही मोटारसायकलवरून भोसरीकडे जात होते. त्यावेळी भोसरी पुलावर रस्त्याच्या दुभाजकाला मेंदनकर याने मोटारसायकलची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला गोपाळे याला डोक्याला, उजव्या हाताच्या मजगटाजवळ दुखापत होऊन त्याच्या पोटालाही भाजले. तसेच मोटारसायकल चालविणाऱ्या मेदनकर याच्याही डोक्याला मार लागला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेदनकर याचा उपचारादरम्यान ६ जून रोजी मृत्यू झाला.
दरम्यान, गोपाळे यांच्यावर उपचार सुरू असल्याने जबाब नोंदणी करून गुन्हा दाखल करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शुक्रवारी (दि. १४) गोपाळे याचा जबाब नोंदवून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश मुंढे यांनी फिर्याद दिली आहे. मोटारसायकल चालक दिग्विजय मेदनकर याने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्याने दुभाजकाला मोटारसायकलची धडक दिल्याने अपघात झाला असल्याचे गोपाळे याने जबाबात नमूद केले असल्याचे भोसरीचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी सांगितले.