पिंपरी-चिंचवडमध्ये हमरस्त्यावर धोकादायक बाजार; वाहनचालक धडधाकट घरी येण्याचा भरोसा आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:13 IST2026-04-08T19:12:51+5:302026-04-08T19:13:04+5:30

ग्राउंड रिपोर्ट - मुख्य रस्त्यांना विक्रेत्यांचा विळखा, भरधाव वाहने, फुटपाथवर विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी: भीषण अपघात होण्याची शक्यता, प्रशासनाचे दुर्लक्ष    

Dangerous market on Hamrastra in Pimpri-Chinchwad; Are drivers confident of returning home safely? | पिंपरी-चिंचवडमध्ये हमरस्त्यावर धोकादायक बाजार; वाहनचालक धडधाकट घरी येण्याचा भरोसा आहे का?

पिंपरी-चिंचवडमध्ये हमरस्त्यावर धोकादायक बाजार; वाहनचालक धडधाकट घरी येण्याचा भरोसा आहे का?

- आकाश झगडे
 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांवर सध्या अनधिकृत फळविक्रेते, भाजीपाला आणि प्लास्टिक साहित्य, खेळणी विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यांच्या कडेला आणि चक्क फूटपाथवर ही दुकाने थाटली जात आहेत. सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमानी ग्राहकांच्या गर्दीमुळे हे रस्ते अरुंद होत असून, रस्त्यावरच खरेदी-विक्री सुरू असते. यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही फळविक्रेत्यांनी तर अजब शक्कल लढवली आहे. दुकानाच्या ५० मीटर अलीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भोंगे लावले जातात. हातात भडक रंगाच्या पिशव्या घेऊन हातवारे करत चालकांचे लक्ष वेधले जाते. यामुळे भरधाव वेगात असलेल्या वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन नियंत्रण सुटण्याचा थोका आहे. अनेकदा ग्राहक खरेदीसाठी अचानक गाडी वळवतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन अपघात होऊ शकतो.

प्रामुख्याने सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मोठी गर्दी होते. रस्त्यावर कामावरून घरी परतणाऱ्यांची गर्दी असते आणि नैसर्गिक प्रकाश कमी झाल्यामुळे दृश्यमानता कमी असते. अशातच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ग्राहकांच्या गाड्यांमुळे रस्ता अर्ध्याहून अधिक व्यापला जातो. चालण्यासाठी फूटपाथ उरले नसल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. टेल्को रोड बर्ड व्हॅलीजवळ, नाशिक फाटा ते मोशी, देहूरोड ते निगडी जकात नाका, खंडोबा मंदिर ते साने चौक, चिखली गावठाण ते देहू आळंदी रोड, निगडी ते भोसरी रोड शहरातील या हमरस्त्यांवर अतिक्रमण आहे.

अनेक चारचाकी चालक वाहने भररस्त्यात उभी करतात. ते गाडीतून खाली उतरत नाहीत; दुकानदारच त्यांना हवी असलेली फळे किंवा वस्तू गाडीच्या खिडकीपर्यंत नेऊन देतो. यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. रस्त्याच्या कडेला उभी राहिल्याने रस्ते अरुंद होत आहेत. 

अतिक्रमण निर्मूलन विभाग करतोय काय? 
महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग नक्की करतो काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. काही 'अर्थ'पूर्ण संबंधांमुळे याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.

मुख्य रस्त्यावर वाहने ८० च्या वेगाने धावतात. अशा ठिकाणी फळविक्रेते च ग्राहकांची गर्दी अपघाताला निमंत्रण देत नाही का, महापालिकेने तातडीने ही अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करावेत.- रवींद्र कदम, नागरिक
 
प्रशासनाला एखादा मोठा अपघात होण्याची प्रतीक्षा आहे का? जर हे मुख्य रस्ते सुरक्षित नसतील, तर आम्ही कर कशासाठी भरायचा? तातडीने या अनधिकृत विक्रेत्यांवर व रस्त्यात गाड्या लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. - सुभाष कुलकर्णी, नागरिक,

Web Title : पिंपरी-चिंचवड की सड़कों पर खतरनाक बाजार: क्या यात्रियों की सुरक्षा खतरे में है?

Web Summary : पिंपरी-चिंचवड की मुख्य सड़कें अवैध विक्रेताओं से भरी हैं, जिससे दुर्घटनाओं का खतरा बढ़ रहा है। फुटपाथ की कमी से पैदल चलने वाले सड़क पर चलने को मजबूर हैं। नागरिक नगरपालिका की निष्क्रियता पर सवाल उठा रहे हैं।

Web Title : Dangerous markets on Pimpri-Chinchwad roads: Commuters' safety at risk?

Web Summary : Pimpri-Chinchwad's main roads are choked by illegal vendors, increasing accident risks. Lack of footpath forces pedestrians onto roads. Citizens question municipal inaction.