Dahi Handi 2025: पिंपरी चिंचवडमध्ये दीडशे मंडळे फोडणार दहीहंडी; सिनेतारका तेजस्विनी पंडित, सायली संजीव, स्मिता गोंदकर यांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 15:33 IST2025-08-15T15:31:59+5:302025-08-15T15:33:02+5:30

पिंपरी-चिंचवडमधील विविध भागात दहीहंडी महोत्सव साजरा केला जात असून जोरदार तयारी सुरू झाली आहे, मंडप आणि एलईडी रोषणाई आणि मराठी हिंदी सिनेतारका यांना बोलावण्यात आले आहे

Dahi Handi will break 150 mandals in Pimpri Chinchwad; attraction of film stars Tejaswini Pandit, Sayali Sanjeev, Smita Gondkar | Dahi Handi 2025: पिंपरी चिंचवडमध्ये दीडशे मंडळे फोडणार दहीहंडी; सिनेतारका तेजस्विनी पंडित, सायली संजीव, स्मिता गोंदकर यांचे आकर्षण

Dahi Handi 2025: पिंपरी चिंचवडमध्ये दीडशे मंडळे फोडणार दहीहंडी; सिनेतारका तेजस्विनी पंडित, सायली संजीव, स्मिता गोंदकर यांचे आकर्षण

पिंपरी : उद्योगनगरीत शनिवारी (दि.१६) दहीहंडीचा सोहळा होणार असून, १५० सार्वजनिक दहीहंडी मंडळांनी परवानगी घेतली आहे. त्यासाठी मराठी आणि हिंदी सिनेतारकांची गर्दी असणार आहे. यंदाच्या सोहळ्यात सिनेतारका तेजस्विनी पंडित, मोनालिसा, श्रीया सरण, सायली संजीव व आयेशा खान, स्मिता गोंदकर यांचे आकर्षण असणार आहे. मुंबई, मावळ आणि ठाण्यामधील गोविंदा पथके लाखोंचे लोणी लुटणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील विविध भागात दहीहंडी महोत्सव साजरा केले जातो. त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडप आणि एलईडी रोषणाई आणि मराठी हिंदी सिनेतारका यांना बोलावण्यात आले आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर भर दिला जाणार आहे.

भोसरीत अपूर्व उत्साह

भोसरीतील छावा संघटनेच्या दहीहंडीस सिनेतारका तेजस्विनी पंडित, मोनालिसा, सूरज चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील गोविंदांना दहीहंडी फोडण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती जालिंदर शिंदे यांनी दिली. इंद्रायणीनगर आणि मोशी परिसरातही दहीहंडी साजरी केली जाते.

पिंपरीत श्रीया सरण, सायली संजीव व आयेशा खान

पिंपरीत संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सव होत आहे. अभिनेत्री श्रीया सरण, सायली संजीव व आयेशा खान या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. यावर्षी ७ लाख ७० हजार ७७७ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.

काचघर चौकात उत्सव

निगडीमधील काचघर चौक येथे राष्ट्रवादीच्या दहीहंडी महोत्सवास मुंबईच्या गोविंदा पथकास आमंत्रित केले आहे, अशी माहिती माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सचिन चिखले यांनी दिली.

आकुर्डी आणि चिंचवडला कलावंतांची उपस्थिती

अखिल चिंचवडगाव समितीच्या वतीने चिंचवड गावात दहीहंडी होणार असून, या सोहळ्यास अभिनेत्री स्मिता गोंदकर उपस्थित राहणार आहेथ. यंदा पाच लाख पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी दिली. वाल्हेकरवाडी आणि रावेतमध्येही तयारी सुरू आहे. आकुर्डी येथेही उत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती कैलास कुटे यांनी दिली. शिवगर्जना प्रतिष्ठान व सुवर्णयुग मित्रमंडळाच्या वतीने प्राधिकरणात दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. या सोहळ्यास अभिनेत्री संजना काळे उपस्थित राहणार असून, १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस आहे, अशी माहिती सरिता साने यांनी दिली.

यमुनानगरातही उत्साह

वीर अभिमन्यू फ्रेंड्स क्लब आणि दत्ता काका साने मित्रमंडळाच्या वतीने चिखलीतील साने चौक येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, अभिनेत्री जोत्स्ना सपकाळ उपस्थित राहणार आहे, अशी माहिती यश साने यांनी माहिती दिली. शिवमुद्रा स्पोर्टस् व युवा ग्रुपच्या वतीने यमुनानगरमध्ये दहीहंडी सोहळा होणार आहे. अभिनेत्री साक्षी गांधी, संजना काळे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अजिंक्य उबाळे यांनी दिली.

राजकीय शक्तिप्रदर्शन

दहीहंडीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते आणि दहीहंडी उत्सव मंडळांनी तयारी केली आहे. चौकाचौकांत फलकबाजी सुरू झाली आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणा, व्यासपीठ उभारणी सुरू असून, विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांना आमंत्रित केले आहे.

Web Title: Dahi Handi will break 150 mandals in Pimpri Chinchwad; attraction of film stars Tejaswini Pandit, Sayali Sanjeev, Smita Gondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.