गोळीबार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:12 IST2020-02-05T16:11:30+5:302020-02-05T16:12:29+5:30

सराईत गुन्हेगाराने केला होता हवेत गोळीबार

crime registred against Three person in firing case; bhosari incident | गोळीबार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; भोसरीतील घटना

गोळीबार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; भोसरीतील घटना

ठळक मुद्देएकाला अटक ; आरोपी सराईत गुन्हेगार

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केला. भोसरी येथील गणेशनगर येथे मंगळवारी (दि. ४) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
ज्ञानेश्वर रामदास लांडगे,  गणेश तिम्मा धोत्रे (दोघे रा. गवळीमाथा, भोसरी), मल्लेश कोळवी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील आरोपी ज्ञानेश्वर लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रशांत बाळासाहेब लांडगे (३०, रा. गणेशनगर, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत आणि आरोपी ज्ञानेश्वर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जुनी भांडणे आहेत. सकाळी अकराच्या सुमारास ज्ञानेश्वर हा साथीदारांना घेऊन प्रशांत यांच्या घरी आला. त्यावेळी आरोपींनी प्रशांत यांना शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर याने हवेत गोळीबार करीत प्रशांत यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. 
ज्ञानेश्वर लांडगे याच्यावर यापूर्वी काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पाच वर्ष तो तुरुंगात देखील होता. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: crime registred against Three person in firing case; bhosari incident