Pimpri Chinchwad: अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
By नारायण बडगुजर | Updated: January 28, 2025 20:39 IST2025-01-28T20:38:52+5:302025-01-28T20:39:15+5:30
भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये नोझलच्या साहाय्याने गॅस रिफील करत असल्याचे आढळून आले

Pimpri Chinchwad: अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये आठ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चिखली येथे ही कारवाई केली.
शशिकांत शंकर भांगरे (४३, रा. साई काॅलनी, चिखली), सागर सूर्यकांत मिरगाजी (२६, रा. बालघरे वस्ती, चिखली), अमर महादेव साठे (२९, रा. भीमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली), योगेश गंगाधर गुंडले (१९, रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. हे संशयित अजय राजेंद्र जैन (रा. चिखली) याच्या सांगण्यावरून गॅस रिफिलिंग करत होते. त्यामुळे अजय जैन याच्यावरही गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बीएनएस कलम २८७, २८८ सह जिवनावश्यक वस्तूचा कायदा १९५५चे कलम ३, ७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अन्वये चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार वस्ती कुदळवाडी येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याबाबात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. भरलेल्या गॅस सिलेंडरमधून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये नोझलच्या साहाय्याने गॅस रिफील करत असल्याचे आढळून आले. या कारवाईमध्ये १२६ गॅस सिलेंडर व दोन टेम्पो असा एकूण आठ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक अभिनय पवार, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार महेश खांडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, नितीन लोखंडे, सोमनाथ मोरे, विनोद वीर, समीर रासकर, अमर कदम, अमोल गोरे, मोहसीन आत्तार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.