CoronaVirus Positive News : मावळ तालुक्यातील माळवाडी येथील परिचारिकेची कोरोनावर मात,रुग्णालयातून सोडले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:58 IST2020-05-20T20:54:50+5:302020-05-20T20:58:04+5:30
संबंधित परिचारिका या शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत

CoronaVirus Positive News : मावळ तालुक्यातील माळवाडी येथील परिचारिकेची कोरोनावर मात,रुग्णालयातून सोडले घरी
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या पूर्व भागातील तळेगाव शहराला लागून असलेल्या माळवाडी येथील दुसऱ्या कोरोनाबाधित ३७ वर्षीय परिचारिकेचा फॉलोअप कोविड १९ चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना पुणे येथील नायडू रुग्णालयातून बुधवारी घरी सोडण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे आणि तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी याबाबत माहिती दिली. संबंधित परिचारिका या शिवाजीनगर येथे खासगी रुग्णालयात सेवेत आहेत. माळवाडी येथून त्या कामासाठी येऊन- जाऊन काम करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात या परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या परिचारिकेवर दि. ९ मेपासून पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कुठल्याही विशेष उपचाराशिवाय प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर परिचारिकेने कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित परिचारिकेच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पती व त्यांची दोन मुले अशा तिघांचे कोरोना चाचणीचे अहवाल यापूर्वीच निगेटीव्ह आले आहेत.
तळेगाव स्टेशन येथील मावळ तालुक्यातील पहिल्या ३४ वर्षीय महिलेचा अहवालही निगेटिव्ह आला असल्याने या दोन्ही अहवालामुळे सध्या तरी मावळ तालुक्याच्या पूर्व भागाला दिलासा मिळाला आहे. माळवाडी येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून ६२ व्यक्तींचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तळेगाव शहरात ९५२ नागरिकांचे होम क्वारंटाईन करण्यात आले असून दोन व्यक्तींचेही संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली.