coronavirus: पुणे विभागातील ३ लाखांहून अधिक उद्योग सुरू, बहुतांश कंपन्यांचे ३० ते ७० टक्के क्षमतेने काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 05:37 IST2020-07-07T05:37:12+5:302020-07-07T05:37:56+5:30
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या पुणे विभागामध्ये लघु, सूक्ष्म, मध्यम (एमएसएमई), सेवा उद्योग आणि मोठे उत्पादन उद्योग मिळून ३ लाख ६५ हजारांहून अधिक उद्योगधंदे आहेत.

coronavirus: पुणे विभागातील ३ लाखांहून अधिक उद्योग सुरू, बहुतांश कंपन्यांचे ३० ते ७० टक्के क्षमतेने काम सुरू
- विशाल शिर्के
पिंपरी : लॉकडाऊनचे (टाळेबंदी) नियम शिथिल केल्यानंतर उद्योगांचा गाडा पूर्वपदावर येत आहे. पुणे विभागातील साडेतीन लाखांहून अधिक उत्पादन आणि सेवा उद्योगांपैकी तीन लाखांहून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. मागणी बेताची असल्याने बहुतांश
उद्योगधंदे तीस ते ७० टक्के क्षमतेने सुरू आहेत.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या पुणे विभागामध्ये लघु, सूक्ष्म, मध्यम (एमएसएमई), सेवा उद्योग आणि मोठे उत्पादन उद्योग मिळून ३ लाख ६५ हजारांहून अधिक उद्योगधंदे आहेत. त्यातील ६० टक्के उद्योग सेवा क्षेत्रातील आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात एमएसएमई क्षेत्रातील २ लाख ३४ हजार उद्योग असून, मोठे उद्योग समूहांची संख्या ८३२ इतकी आहे. आॅटोमोबाईल, फोर्जिंग, इलेक्ट्रॉनिक, कृषी प्रक्रिया अशा उद्योगांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या काळात कच्च्या मालाचा तुटवडा होता. तो देखील पूर्वपदावर येत आहे. माघारी गेलेल्या मजुरांपैकी २५ हजार मजूर परत आले आहेत. रोजंदारी, कॉन्ट्रॅक्टवरील आणि मालाची चढ-उतार करणाऱ्या मजुरांचा वानवा आहे.
विभागातील सर्व मोठ्या कंपन्या सुरू झालेल्या आहे. झेरॉक्स अथवा तत्सम सेवा क्षेत्रातील लहान व्यवसाय-उद्योग अजून पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. मागणी बेताची असल्याने तेथील कामकाज ३० ते ७० टक्के सुरू आहे. बजाजसारख्या कंपन्यांना बाहेरील देशातून मोठी मागणी असल्याने तेथील कामकाज तीनही शिफ्टमधे सुरू आहे. १६०० पैकी पंधराशे कर्मचारी कामावर येत आहेत. केवळ,कंटेन्मेंट झोनमधील कर्मचारी हजर राहू शकले नाहीत. - सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग विभाग