Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरातील २०० परमीट रुम, बिअरबार राहणार बंद : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:18 IST2020-03-18T21:18:36+5:302020-03-18T21:18:49+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या अकरावर

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरातील २०० परमीट रुम, बिअरबार राहणार बंद : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
पिंपरी : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारांकित हॉटेल वगळून इतर हॉटेलमधील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे दोनशे परमीट रुम व बिअर बार बंद राहणार आहेत. वाईन शॉप, बिअर शॉपी तसेच देशी दारु विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. खाद्यगृह अत्यावश्यक सेवा असून, ते बंद करण्यात येऊ नयेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या अकरावर गेली आहे. त्यामुळे अधिक दक्षतेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (दि. १८) मद्यविक्रीबाबत निर्देश दिले आहेत. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.
विदेशी पर्यटक तसेच परदेशातून आलेले नागरिक पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यातील काही जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हॉटेल, परमीट रुम व बिअर बार अशा ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर बार रेस्टॉरन्ट, परमीट रुम, बिअर बार १८ ते ३१ मार्च दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
कोट्यवधींची उलाढाल होणार ठप्प
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लहान-मोठे असे एकूण ८०० हॉटेल आहेत. यात सुमारे २०० बिअरबार, परमिट रुम आहेत. त्यामुळे हे सर्व बिअरबार, परमीट रुम बंद राहणार आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.
खाद्यगृह सुरू ठेवा
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आहेत. ते हॉटेल व खानावळींमध्ये दररोजचे जेवण घेतात. त्यामुळे अशी खाद्यगृहे अत्यावश्यक सेवेत मोडतात. ही खाद्यगृहे व हॉटेल बंद करण्यात येऊ, नयेत अशी मागणी पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीची उपाययोजना हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल, खाद्यगृहे व खानावळीतून घेण्यात येत आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी व कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी दिली.