अतिदक्षता विभागातील कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या! रुग्णालयाने हलगर्जीपणा केला असल्याचा नातेवाईकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 19:41 IST2021-05-09T19:41:32+5:302021-05-09T19:41:42+5:30
स्टोअर रूममधील टेलिफोन वायरने घेतला गळफास

अतिदक्षता विभागातील कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या! रुग्णालयाने हलगर्जीपणा केला असल्याचा नातेवाईकांचा आरोप
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील मायमर संचलित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाने स्टोअर रूममध्ये टेलिफोन वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला. सोमनाथ तुकाराम हुलावळे (४४, रा.कार्ला) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती समजताच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. शरद हुलावळे म्हणाले, सोमनाथ हुलावळे यांच्या आत्महत्येस रुग्णालय व्यवस्थापनाचा गलथान कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत आहे. रुग्णालयात आत्महत्तेसारखा प्रकार घडेपर्यंत रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी काय झोपले होते का? रुग्णालय व्यवस्थापनावर कडक करवाई करण्यात यावी. आपल्या चुलत्याच्या मृत्युस मायमर हॉस्पिटल प्राशसन जबाबदार असल्याचा आरोप दिनेश हनुमंत हुलावळे यांनी केला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सोमनाथ हुलावळे यांना शनिवारी मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कोव्हीडच्या अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर उपचार सुरू होते. या ठिकाणी अतिदक्षता विभागात एकूण १९ रुग्णांवर उपचार सुरू होते. हुलावळे यांनी अतिदक्षता विभागातील नजीकच्या स्टोअर रूममध्ये फॅनच्या हुकाला टेलिफोन वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन गेंगजे यांनी शवविच्छेदन केले. तळेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यु अशी प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गांनाथ साळी करत आहेत.