चिंताजनक! पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 20:57 IST2022-01-06T20:44:05+5:302022-01-06T20:57:04+5:30
Pimpri Chinchwad corona update: पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे

चिंताजनक! पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ
पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून कोरोनामुक्तांचीही संख्या कमी झाली आहे. आज तब्बल ८१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. दाखल रुग्णांची संख्या २८२ वर पोहोचली आहे. कोरोनाने दिवसभरात एकाचा बळी घेतला आहे. तर सणांमुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास खोडा बसला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला आहे. शहर परिसरातील खासगी आणि शासकीय अशा विविध रुग्णालयांमध्ये ७ हजार ९१२ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांपैकी ८१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या २८२ वर पोहोचली आहे.
कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी झाले आहे. २२ जण कोरोनामुक्त झाले असून आजपर्यंत एकूण कोरोनामुक्तांची संख्या २ लाख ७५ हजार ३७१ वर पोहोचली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ७९ हजार ३२९ वर पोहोचली आहे.
मृत्यूचा आलेख स्थिर-
मृतांचा आलेख स्थिर आहे. शहरातील एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर कोरोनाने मृत होणाºयांची संख्या ४ हजार ५२६ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, तरूणांचा समावेश अधिक आहे.
लसीकरणास खोडा-
महापालिका परिसरात मागील आठवड्यात लसीकरण मंदावले आहे. सणांमुळे लसीकरणास खोडा बसला आहे. शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालये अशी २०२ केंद्र सुरू आहे. आज ५ हजार १८५ जणांना लस देण्यात आली आहे. एकूण लसीकरण ३० लाख १८ हजार ६८२ वर पोहोचले आहे.