पिंपरी चिंचवडमध्ये ‘कंटेन्मेंट झोन’; २७ एप्रिलपर्यंत कडक अंमलबजावणी राहणार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:08 IST2020-04-21T13:07:38+5:302020-04-21T13:08:59+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कंटेन्मेंट झोन’; २७ एप्रिलपर्यंत कडक अंमलबजावणी राहणार सुरु
पिंपरी : औद्योगिकनगरीत १० दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने शहराच्या सीमा सील केल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. हा आदेश २७ एप्रिलपर्यंत कार्यरत राहणार आहे. त्यामुळे संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू झाली असून, पोलिसांकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात स्थानिक प्रसार सुरू होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरणाऱ्यांवर मर्यादा आणण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील संपूर्ण भाग आजपासून कंटेन्मेंट झोन जाहीर झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व सीमा व शहरातून बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद केले आहेत.
...........................................
दुपारनंतर शुकशुकाट
शहरातील नागरिकांच्या बँकिंग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याच्या सूचनाकेल्या होत्या. त्यानुसार दुपारी दोननंतर बँका, पतसंस्था बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शहरातील विविध बँकांची एटीएम केंद्रे सुरू होती.
................................
कडेकोट बंदोबस्त
पुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती-शक्ती चौक, दापोडी चौक, बंगळुरू महामार्गावरील किवळे चौक, वाकड चौक, पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी चौक, आळंदी ते पुणे रस्त्यावरील देहूफाटा चौक, दिघी चौक, देहूगाव ते आळंदी रस्त्यावरील तळवडे , चाकण ते तळवडे रस्त्यावर चाकण एमआयडीच्या सीमेवर रस्ता बंद केला आहे. येणाऱ्या वाहनांची तपासणी करूनच वाहनांना सोडले जात आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे, पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचारी व वाहनांना सोडण्यात येत आहेत.
..........................................
मंडईवरही नियंत्रण
संचारबंदीचे पालन काटेकोरपणे केले जात आहे. कंटेन्मेंट झोन तयार केल्याने सकाळी १० ते दुपारी २ या कालवधीतच दूध, भाजीपाला, फळे यांची किरकोळ विक्री करावी. तसेच ही विक्री मनपामार्फत निश्चित केलेल्या जागांवरच असावी, असे निर्देश दिले होते. शहरातील चाळीस ठिकाणी दिवसभर भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. मात्र, नवीन आदेशामुळे दुपारी दोनपर्यंतच मंडई सुरू होत्या. दुपारनंतर भाजी मंडई बंद करण्यात आल्या होत्या.