पुणे : राज्य युवक काँग्रेसने ऐनवेळी केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची केंद्रीय युवक काँग्रेसची भूमिका योग्यच असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी सपकाळ पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी अशा नियुक्त्या करतानाची पक्षाची जी पद्धत आहे, ती वापरली गेली नसल्याचे स्पष्ट केले.पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. सपकाळ म्हणाले, कोणत्याही पक्ष संघटनेत नव्या नियुक्त्या करण्याची एक पद्धत तयार झालेली असती. ती सर्वमान्य असते. प्रदेश युवक काँग्रेसकडून झालेल्या नियुक्त्या या पद्धतीत बसत नव्हत्या. त्यामुळे केंद्रीय युवक काँग्रेसच्या संबंधित समितीने त्या सर्व नियुक्त्या रद्द केल्याचे जाहीर केले. तसे परिपत्रक जारी केले. हा निर्णय योग्य असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. राज्यातील या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीने दिल्लीत बोलावले आहे. तिथे समितीमधील पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक होईल व यावर तोडगा निघेल, असे ते म्हणाले.
पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सपकाळ यांचे स्वागत केले. प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, तसेच माजी आमदार उल्हास पवार, दिप्ती चवधरी, संजय जगताप व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सपकाळ यांनी दिसभरात पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण व पुणे शहर, अशा बैठका घेतल्या. पदाधिकारी, कार्यकर्ते यांची त्यांनी ओळख करून घेतली. पक्षाने सर्वांना भरपूर दिले आहे, आता पक्षाला काही देण्याची गरज आहे, त्यामुळे मतभेद असतील ते मिटवून एकविचाराने पक्षाचे काम करावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले. पक्षाचे आजीमाजी लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते यांच्याबरोबरही सपकाळ यांनी चर्चा केली.
निष्ठावंतांनी केल्या तक्रारीपुणे शहराच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने तक्रार करण्यास सुरुवात केल्यावर सपकाळ म्हणाले, तक्रारी करू नका, मी काही सूचनापेटी नाही. त्यावर संबंधित कार्यकर्त्याने, तक्रारी करत नाही, मग तुम्ही उपाय शोधा, म्हणजे तक्रारी होणारच नाहीत, असे सांगितले. तसेच, पक्षाकडून ऐनवेळी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते, कार्यकर्ते त्यांचे काम करतात. नंतर तो पक्ष सोडून जातो, यामध्ये पक्षाचे उमेदवारीसाठी पात्र असलेले अनेक निष्ठावान कार्यकर्ते उपेक्षित राहतात, असेही काही जणांनी सांगितले. याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन सपकाळ यांनी दिले.