'Cluster' for security of ATMs, jewellers shops in Pimpri Chinchwad: Commissioner of Police Krishna Prakash | पिंपरी चिंचवडमधील एटीएम, ज्वेलर्स दुकानांच्या सुरक्षेसाठी 'क्लस्टर' : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी चिंचवडमधील एटीएम, ज्वेलर्स दुकानांच्या सुरक्षेसाठी 'क्लस्टर' : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड हद्दीत चोरी, एटीएम तसेच ज्वेलर्स दुकाने फोडण्याच्या घटनेत वाढ

नारायण बडगुजर
पिंपरी : जबरी चोरी, चोरी आदी गुन्हे रोखण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. एटीएम तसेच ज्वेलर्स दुकानांच्या सुरक्षेसाठी रात्रगस्तीवर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्वेलर्स दुकानांचे मॅप तयार करून क्लस्टर तयार केला जाईल. पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांचा व्हॉटसअप ग्रुप राहणार असून पोलीस नियंत्रण कक्षाचे त्यावर नियंत्रण राहणार आहे, असे कृष्ण प्रकाश यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोबाइल फोन चोरी, एटीएम फोडण्याचे प्रकार तसेच ज्वेलर्स दुकाने फोडून चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्तालयाच्या हद्दीतील ज्वेलर्सची दुकाने व एटीएमचा आढावा घेण्यात आला. कोणत्या एटीएम तसेच दुकानात व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अलार्म सिस्टम, सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत किंवा नाही, याबाबत पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत ज्वेलर्स दुकानदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. ज्वेलर्स दुकानांचे मॅप तयार करून त्यांचा क्लस्टर करण्यात येईल.

गस्तीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत व्हाटसअप ग्रुप तयार केला जाईल. गस्तीवर जाताना संबंधित पोलिसांनी त्या ग्रुपवर तसेच पोलीस ठाण्याला रिपोर्ट करावा. त्यांनी त्यांचे मोबाइल लोकेशन ऑन ठेवणे आवश्यक आहे. आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील अधिका-यांचा मोबाइल क्रमांक देखील या ग्रुपमध्ये समाविष्ट केला जाईल. त्यामुळे या ग्रुपवर नियंत्रण राहील. यासाठी क्यूआरकोड सिस्टम उपलब्ध करून दिली जाईल. तोपर्यंत पोलिसांना गस्ती दरम्यान भेट दिलेल्या ठिकाणांचा सेल्फी काढून ग्रुपवर शेअर करावा लागणार आहे.

वाहनांची तपासणी करणार
ज्वेलर्स दुकानांसमोर रात्री वाहने उभी करून त्याचा आडोसा घेऊन दुकान फोडून चोरी केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रात्री उशिरा अशा पद्धतीने दुकानांपुढे वाहने पार्क केल्याचे आढळल्यास त्यांची तपासणी करण्यात येईल. इतक्या रात्री वाहन येथे कसे, असा प्रश्न गस्तीवरील पोलिसांनी उपस्थित केला पाहिजे. त्यासाठी ज्वलर्स दुकानांचा क्लस्टर तयार करून गस्तीचे नियोजन केले जाईल, असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

शांतता समित्यांची मदत
आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत शांतता समिती आहे. या समित्यांच्या सदस्यांचीही रात्रगस्तीसाठी मदत घेण्यात येत आहे. गस्तीसाठी वेळ देऊ इच्छिणा-या सदस्यांची नोंदणी संबंधित पोलीस ठाण्यांकडून होत आहे.

रात्रगस्तीसाठी सिस्टम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्यावर भर आहे. तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनाही सहभागी करून घेण्याबाबत विचार सुरू आहे.  
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: 'Cluster' for security of ATMs, jewellers shops in Pimpri Chinchwad: Commissioner of Police Krishna Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.